बॅरिकेडस् तोडून घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न, पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, January 26, 2021

बॅरिकेडस् तोडून घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न, पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर

https://ift.tt/39jyDff
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज अभूतपूर्व असं चित्र पाहायला मिळतंय. एकीकडे प्रजासत्ताक दिनानिमित्तानं राजपथावर परेड सुरु आहे. या परेडसाठी , संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासहीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही हजेरी लावलीय. तर दुसरीकडे इथून अगदी काही किलोमीटर अंतरावर दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलक आणि पोलीस यांच्यात धुमश्चक्री उडालेली पाहायला मिळतेय. कृषी कायद्यांचा विरोध करत शेतकरी आंदोलक आज प्रजासत्ताक दिनाला दिल्लीत काढत आहेत. परंतु, या ट्रॅक्टर रॅलीसाठी दिल्लीत दाखल होणाऱ्या शेतकरी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांकडून केला जात आहे. यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेडस् उभारले. इतकंच नाही तर राजधानीकडे निघालेल्या वाहनांना रोखण्यासाठी करनाल बायपासवर मंगळवारी एका रात्रीतच एक भली मोठी तात्पुरती भिंत उभारण्यात आली. परंतु, शेतकरी आंदोलक मात्र आपल्या निश्चयावर ठाम आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी पोलीस बॅरिकेडिंग तोडत पायी चालत दिल्लीकडे कूच सुरू केलीय. सिंघु सीमेवर आणि टिकरी सीमेवर हजारोंच्या संख्येत शेतकरी जमा झाले आहेत. आपल्यासोबत आणलेले ट्रॅक्टर त्यांना दिल्लीत न्यायचे आहेत. केवळ सिंघु सीमेवर जवळपास ५००० आंदोलक जमा झाले आहेत. दुसरीकडे, कायदे सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी दिल्ली पोलिसांच्या खांद्यावर आहेत. त्यामुळे बॅरिकेडस् तोडून दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आला. शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली मुंडका भागात दाखल झालीय. इथून पुढचा टप्पा असेल नांगलोई... निश्चित करण्यात आलेल्या मार्गानुसार, नांगलोईनंतर ही ट्रॅक्टर रॅली नजफगडकडे रवाना होईल. पोलिसांकडून नांगलोईमध्ये ठिकठिकाणी रस्ते ब्लॉक करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी मध्य दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय.