
मुंबई: छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरत असलेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेनं नुकतंच एक स्तुत्य उपक्रम केला. अलीकडेच या मालिकेनं २५० भागांचा टप्पा पूर्ण केला. विशेष म्हणजे या संपूर्ण टीमनं हट के पद्धतीनं या खास दिवसाचं सेलिब्रेशन केलं. मालिकेने २५० भागांचा टप्पा गाठल्यामुळे मालिकेच्या टीमनं पुण्याजवळील ‘’ या संस्थेला भेट दिली. केवळ भेटच नाही तर त्यांनी त्यांच्या एक दिवसाचं मानधनदेखील सेवाभावी संस्थेला भेट म्हणून दिलं. ही संस्था गेली अनेक वर्षं अनाथ मुलं आणि वृद्धांची काळजी घेत आहे. ‘आपलं घर ही संस्था अनेक वर्षांपासून अनाथ मुलं आणि वृद्धांचं संगोपन करतेय. अनेक कलाकारदेखील या संस्थेशी जोडले गेले आहेत. याबद्दल मला माहीत होतं. त्यामुळेच ‘आई कुठे काय करते’च्या २५० भागांचं सेलिब्रेशन आम्ही या संस्थेतील खास परिवारासोबत करायचं ठरवलं. आमच्या संपूर्ण टीमनं अख्खा दिवस या परिवारासोबत घालवला. केक कटिंग आणि धमाल करत आम्ही हा दिवस संस्मरणीय केला. या कल्पनेला सर्वांनीच होकार दिल्यामुळे हे शक्य झालं,’ असं मालिकेचे दिग्दर्शक रवींद्र करमरकर म्हणाले.