
पुणे: रिक्षाने प्रवास करत असताना, महिलेच्या पर्समधील दागिने आणि रोकड असा दीड लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात दोन अनोळखी महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेरगाव येथील पुष्पा पाटील (वय ५७) या पतीसोबत सोमवारी संध्याकाळी रिक्षाने जात होत्या. नाशिक फाटा येथून पिंपरी गाव, तापकीर चौक या दरम्यान त्यांनी रिक्षाने प्रवास केला. त्याचवेळी रस्त्यात दोन अनोळखी महिला रिक्षात येऊन बसल्या. त्या महिलांनी पाटील यांच्या पर्समधील दागिने आणि रोकड असा जवळपास दीड लाख रुपयांचा ऐवज चोरला. मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षात बसलेल्या दोन अनोळखी महिलांनी पाटील यांचे लक्ष विचलित केले. त्यांच्या पर्समधून १ लाख ३० हजार रुपये किंमतीची सोन्याची गंठण, १५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या साखळ्या आणि साडेचार हजारांची रोकड असा १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. पाटील या तापकीर चौकात आल्यानंतर त्यांच्या पर्समधून दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, दोन अनोळखी महिलांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.