बीजिंग: करोना महासाथीच्या आजाराचा उगम केंद्र असल्याचा आरोप झेलणाऱ्या चीनने आपली प्रतिमा सुधारण्यासाठी इतर देशांना लस पुरवठा करण्याचे नियोजन आखले. मात्र, हा डाव आता त्यांच्या अंगलट आला असल्याचे म्हटले जात आहे. चीनने अनेक देशांना लस पुरवठा करण्याचे वचन दिले होते. मात्र, लस पुरवठा उशिराने होत असल्यामुळे चीनवर नाराजी वाढत चालली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने जवळपास २४ देशांसोबत लस करार केला आहे. यामध्ये बहुतांशी देश हे विकसनशील देश आहेत. ब्राझील आणि तुर्कीनेदेखील मागणीपेक्षा कमी लस डोस मिळाल्याची तक्रार केली आहे. ब्राझीलला भारताकडून सिरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेली AstraZeneca ची लस पाठवण्यात आली आहे. ब्राझीलला धडा शिकवण्यासाठीच चीनकडून जाणीवपूर्वक उशीर केला जात असल्याची चर्चा ब्राझीलमध्ये सुरू आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो यांनी चीनविरोधात सातत्याने विधाने केली आहेत. वाचा: वाचा: चीनचे म्हणणे काय? वृत्तानुसार, चीनने लस डोस वितरणाला उशीर होण्यासाठी देशातंर्गत मागणीचे कारण पुढे केले आहे. चीनमध्ये करोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर लस पुरवठा करण्यासह देशातंर्गत लसीकरण करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तर, ब्राझीलच्या संसदीय सभागृहाचे अध्यक्ष रॉड्रीगो माइया यांनी सांगितले की, चीनने लस डोस पुरवठ्याला उशीर होण्यामागे काही तांत्रिक बाबींचे कारण दिले आहे. वाचा: लस उत्पादन करणारी Sinovac कंपनीने लस उत्पादन आणि पॅकेजिंगच्या कामासाठी नोकरी भरतीची जाहिरात दिली आहे. Sinovac ची लस उत्पादनाचा कारखाना असलेल्या भागात करोनाबाधितांची संख्या वाढली असल्यामुळे स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे कारखान्यात काम करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्याचा परिणाम लस उत्पादनावर झाला असल्याचे म्हटले जाते.