म. टा. प्रतिनिधी, सर्वांसाठी लोकल खुली झाल्यानंतर गर्दी निवारण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना अद्याप कागदावरच आहेत. लोकलमधील गर्दी विभागण्यासाठी बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या लंचब्रेकमध्येदेखील कपात करण्यात आली होती. मात्र अद्याप वेळ बदलण्याचा निर्णय झालेला नसल्याने भविष्यात रेल्वे प्रवाशांच्या अडचणीत वाढच होण्याची शक्यता आहे. ( Crowd Management) सरकारी तसेच खासगी कार्यालये, बाजारपेठा, बहुराष्ट्रीय कंपन्या यांसह अन्य आस्थापना सुरू होण्याच्या वेळा एकच असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये अतिप्रचंड गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागतो. याचवेळेत मुंबईतील प्रमुख रस्त्यांवरदेखील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यामुळे इंधन खर्चात वाढ होते. प्रदूषणामुळे हवेचा दर्जा बिघडतो. प्रवाशांचा मौल्यवान वेळही वाया जातो. वाचा: वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालये साधारणपणे सकाळी ९ ते १० या दरम्यान सुरू होतात आणि सायंकाळी साडेपाच वाजता बंद होतात. ही कार्यालये सकाळी ७ ते दुपारी ३ किंवा दुपारी ३ ते १० या वेळेत सुरू करण्याबाबत प्रस्ताव होता. या वेळेला बीकेसी प्रॉपर्टी असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. निर्णय झाल्यावर तातडीने याची अंमलबजावणी करण्यात येणार होती. तूर्त यावर निर्णय झालेला नाही, असे सरकारी अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. मुंबईतील प्रमुख बाजारपेठा वेगवेगळ्या वेळेत सुरू कराव्यात. यामुळे रेल्वे आणि रस्ते प्रवासातील गर्दी कमी होण्यास मदत होईल, असे सांगत झवेरी बाजाराशी संलग्न असलेल्या जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिलनेदेखील या वेळबदलास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. वाचा: गर्दीमुळे होणारे रेल्वे अपघात कमी करण्यासाठी राज्य सरकारने कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे, याबाबत उच्च न्यायालयानेदेखील अनेकदा सरकारला सूचना केल्या आहेत. मात्र राज्य सरकारकडून केवळ विचार सुरू आहे, अशीच भूमिका मांडण्यात आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून स्वागत करोना काळात संसर्ग टाळण्यासाठी आणि सुरक्षित वावर नियमांचे पालन करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागीय कार्यालयाने कामांच्या वेळेत बदल केला आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. कार्यालयीन वेळ बदलाचे कर्मचाऱ्यांनीदेखील स्वागत केले आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.