
बीजिंग: करोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी सगळ्या जगाचे लक्ष लशींकडे लागले आहे. तर, दुसरीकडे बनावट लस पुरवठा करणारे रॅकेट उघडकीस आले आहे. बनावट लस पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी ८० हून अधिकजणांना अटक केली आहे. टोळीकडून तीन हजारांहून अधिक बनावट डोस जप्त करण्यात आले आहे. चिनी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, या टोळीकडून मागील सप्टेंबर महिन्यांपासून बनावट लशींचा पुरवठा सुरू होता. पोलीस या बनावट लशींच्या मागावर होते. अखेर या टोळीपर्यंत पोहचण्यास पोलिसांना यश आले. या बनावट लशी परदेशातही पोहचवण्याचा या टोळीचा प्रयत्न असू शकतो, अशी शक्यता चीन सरकारचे वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'ने वर्तवली. पोलिसांनी बीजिंग, शांघाई, पूर्व प्रांतातील शानदोंगसह अनेक ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत तीन हजारांहून अधिक डोस जप्त करण्यात आले असून ८० हून अधिकजणांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आणखी तपास सुरू आहे. वाचा: जगभरातील अनेक देश करोनाच्या संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी लस विकसित करत आहेत. तर, काही देश इतर देशांकडून लशीची मागणी करत आहेत. अशातच बनावट लशीचे प्रकरण समोर आल्यामुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, जगभरात संसर्ग वाढीचा वेग कमी होत असताना दुसरीकडे चीनमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. जानेवारी महिन्यातच चीनमध्ये दोन हजारांहून अधिक बाधितांचे प्रकरणे समोर आली आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात बाधितांची एवढ्या प्रमाणावर नोंद करण्यात आली होती. वाचा: चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये एक ते ३० जानेवारी दरम्यान २०१६ करोनाबाधित आढळले. यामध्ये परदेशातून आलेल्या ४३५ जणांचा समावेश आहे. त्याशिवाय जानेवारी महिन्यात दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आयोगाने दिली. चीनमध्ये काही महिन्यानंतर करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.