नवी दिल्ली : दिल्लीच्या सिंघु सीमेवर शेतकरी आंदोलनात सहभागी एका आंदोलनकर्त्याकडून एका दिल्ली पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. मंगळवारी रात्री ८.०० वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचं समजतंय. यानंतर या आरोपीला अटक करण्यात आलीय. हरप्रीत सिंह या आंदोलनकर्त्यानं तलवारीच्या बळावर दिल्ली पोलिसांकडून अगोदर गाडी आपल्या ताब्यात घेतली. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केल्यानंतर आरोपीनं मुकरबा चौकात गाडी सोडून देत एक स्कूटी घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पोलीस () समयपूर बादली आशिष दुबे आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत आरोपीचा पाठलाग करत होते. पोलिसांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीनं आशिष दुबे यांच्यावर केला. या हल्ल्यात दुबे थोडक्यात बचावले आहेत. परंतु त्यांच्या हातावर आणि गळ्यावर गंभीर दुखापत झालीय. हल्ल्यानंतर ताबडतोब आशिष दुबे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आरोपी हरप्रीत सिंह हा पंजाबचा रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पहिला गुन्हा हा दरोडेखोरीचा तर ३०७ अर्थात हत्येच्या प्रयत्नात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घटना घडली तेव्हा आरोपीनं कोणतीही नशा केली नव्हती. आरोपीनं पोलिसांवर हा हल्ला का केला? त्याचं कारण मात्र समजू शकलेलं नाही.