
तेहरान: पाकिस्तानच्या हद्दीतून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांनी त्रस्त झालेल्या इराणने पाकिस्तानला दणका दिला. इराणने पाकिस्तानच्या हद्दीत शिरून सर्जिकल स्ट्राइक केला. या स्ट्राइकनंतर इराणने आपल्या दोन जवानांची सुटकाही केली. इराणच्या रिवॉल्यूशनरी गार्ड्सने जैश अल-अदलच्या ठिकाणांवर हल्ला केला. इराणच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जैश उल- अदल एक कट्टर वहाबी दहशतवादी संघटना असून पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम भागातील इराणच्या सीमेवर सक्रिय आहे. या दहशतवादी संघटनेने २०१९ मध्ये इराणी सैन्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. यामध्ये काही जवान ठार झाले होते. इराणी सैन्याने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी रात्री सर्जिकल स्ट्राइक केला. इराणच्या सैन्याने एक यशस्वी मोहीम राबवली असून मागील अडीच वर्षांपासून जैश उल अदलच्या कैदेत असलेल्या दोन जवानांची सुटका केली असल्याचे इराणच्या लष्कराने सांगितले. या मोहिमेनंतर सर्व जवान इराणमध्ये सुखरुपपणे दाखल झाले असल्याचे इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. १६ ऑक्टोबर २०१८ रोजी जैश उल-अदलने इराणच्या १२ जवानांचे अपहरण केले होते. ही घटना पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील मर्कवा शहरात घडली होती. हा भाग पाकिस्तान-इराण सीमेच्या नजिक आहे. जवानांची सुटका करण्यासाठी इराण आणि पाकिस्तानने संयुक्त समितीदेखील स्थापन केली होती. जैश अल अदलने नोव्हेंबर २०१८ मध्ये पाच जवानांची सुटका केली. तर, २१ मार्च २०१९ रोजी पाकिस्तानी सैन्याने आपल्या कारवाईत इराणी सैन्याच्या चार जवानांची सुटका केली.