
वॉशिंग्टन: करोनाच्या वाढत्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अमेरिकेने तिसऱ्या लशीला मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने 'जॉन्सन अॅण्ड जॉन्सन'च्या लशीला मंजुरी दिली आहे. जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या लशीच्या एकाच डोसमुळे करोनाला संसर्गाला अटकाव करता येणार आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला मोठी मदत होणार असल्याचे म्हटले जात आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पॅनलने एकमताने लशीला मंजुरी दिली. ही गंभीर आजारी, रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असलेले रुग्ण आणि करोनापासून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. या लशीमुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. आता करोनाला अटकाव करण्यासाठी तिसरी लस उपलब्ध झाल्यामुळे लसीकरण मोहिमेला वेग येणार असल्याची अपेक्षा वाढली आहे. वाचा: अमेरिकेत आतापर्यंत जवळपास चार कोटी ४० लाखजणांना फायजर अथवा मॉडर्नाच्या लशीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. तर, दोन कोटी लोकांना लशीचा दुसरा डोस मिळाला आहे. या लशी ९० ते ९५ टक्के प्रभावी असल्याचे चाचणीत आढळले आहे. वाचा: सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, जून अखेरपर्यंत १० कोटी लशीचे डोस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तर, येत्या काही दिवसांतच ३० ते ४० लाख लशीचे डोस तातडीने उपलब्ध होणार असल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले आहे. वाचा: जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या लशीची चाचणी तीन खंडांमध्ये करण्यात आली होती. अमेरिकेत गंभीर आजाराविरोधात ८५.९ टक्के, दक्षिण आफ्रिकेत ८१.७ टक्के आणि ब्राझीलमध्ये ८७.६ टक्के ही लस सुरक्षित असल्याचे आढळून आली. असा होणार फायदा जॉन्सन अॅण्ड जॉन्सनची लस शून्य तापमानात ठेवण्याची आवश्यकता नाही. त्याशिवाय दोनऐवजी एकाच डोसमध्ये रोगप्रतिकारक शक्ती विकसित केली जाऊ शकते.