
कोलकाता : पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल पक्ष आणि केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलंय. मुख्यमंत्री यांनी भाजपवर हल्ला करत ' नष्ट करणारा भाजप आता सोनार बांग्लाच्या गोष्टी करत आहेत' असं म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाला दुसरा कोणताही पर्याय नाही. राज्यात इतर कोणताही पक्ष तृणमूल काँग्रेसची जागा घेऊ शकत नाही, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. भाजप हा पक्ष सत्ताधारी तृणमूल काँग्रेससाठी सर्वात मोठं आव्हान म्हणून राज्यात मुसंडी मारण्याच्या प्रयत्नात आहे. राज्यातील कायदे-व्यवस्थेच्या मुद्यावर भाजपकडून सतत ममता बॅनर्जी सरकारवर हल्ला चढवला जात आहे. तृणमूल काँग्रेस उत्तम प्रशासनासाठी काम करेल. इतर कोणताही पक्ष आपलं स्थान घेऊ शकत नाही. कारण टीएमसी जगातील सर्वात जनहितार्थ सरकार दिलंय, असंही ममतांनी म्हटलंय. गुरुवारी कोलकात्यात तृणमूल काँग्रेसच्या अनुसूचित जाती आणि जमाती नेत्यांच्या बैठकीत ममता बॅनर्जी बोलत होत्या. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पावर टीका करत 'भाजपनं सोनार भारत नष्ट केला आहे आता सोनार बांग्लाच्या गोष्टी करत आहेत' अशी खरमरीत टीकाही ममतांनी केलीय. ज्यांनी देश विकायला काढलाय त्यांनी पश्चिम बंगालवर नजर टाकण्याअगोदर आरसा पाहायला हवा, अशी चपराकही त्यांनी भाजपला लगावलीय. भाजपवर सोशल मीडियाचा वापर करून दुष्प्रचार आणि खोटी माहिती पसरविण्याचा आरोपही ममतांनी केला आहे. 'अम्फान चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत पोहचवण्यासाठी हरएक संभव प्रयत्न आम्ही केले... परंतु, एखाद-दुसऱ्या चुकांसाठी आम्हाला टीकेचा सामना करावा लागला' अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारनं नागरिकत्व सुधारणा कायदे मागे घ्यायला हवेत तसंच अशा कायद्यांचं अस्तित्व देशाच्या नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतं, असंही त्यांनी म्हटलंय. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजनं राज्यात ४२ जागांपैंकी १८ जागांवर विजय मिळवला होता. आता राज्यात एप्रिल-मे महिन्यात विधानसभा होणार आहेत. या निवडणुकीत २०० हून अधिक जागा मिळवण्याचं लक्ष्य भाजपनं समोर ठेवलंय.