
यंगून: लष्करी बंड करून लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की यांच्यासह इतर नेत्यांवर निर्बंध लावल्यानंतर म्यानमारमधील सर्वसामान्य नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत. मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरले आणि जोरात हॉर्न वाजवले. लष्कराच्या विरोधात नागरिकांनी घोषणाबाजीही केली. तर, आरोग्य कर्मचाऱ्यांनीही आदेश मानण्यास नकार दिला आहे. तर, दुसरीकडे देशाची सत्ता हाती घेतलेल्या लष्कराची पहिली बैठक पार पडली. स्यू की यांच्या सरकारवर विविध आरोप या वेळी ठेवण्यात आले. सरकारी रुग्णालये आणि संस्थांमधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी बुधवारी एक निवेदन जारी करत लष्करशाहीला विरोध दर्शवला आहे. कर्मचाऱ्यांनी लाल रिबीन बांधून लष्करशाहीचे आदेश मानणार नसल्याचे म्हटले. काही ठिकाणी कर्मचारी संपावर गेले आहेत. सध्या काही ठिकाणी फक्त धर्मदाय संस्थांची रुग्णालये, आरोग्य केंद्र सुरू आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे छायाचित्र सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. वाचा: वाचा: रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनी जोरात हॉर्न, ड्रम वाजवले. एका आंदोलकाच्या म्हणण्यानुसार, ड्रम वाजवणे म्हणजे शत्रूला जोरदार विरोध करणे असे म्यानमारची संस्कृती सांगते. जोरजोरात वाद्य वाजवून, गाड्यांचे हॉर्न वाजवून आम्ही सरकारचा विरोध नोंदवला. लोकशाहीचे समर्थन करणाऱ्या नागरिकांनी स्थानिक प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री आठची वेळ निश्चित केली होती. स्यू की यांच्या निकटवर्तीय नेत्यांच्या माहितीनुसार, जोरदार निदर्शने करून लष्कराविरुद्ध असहकार पुकारण्याची गरज आहे. वाचा: स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षाचे नेते विन हेटिन म्हणाले, ‘नेपितॉ येथील वातावरण तणावपूर्ण आहे. शेकडो लोकप्रतिनिधींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. हा संपूर्ण संघर्ष पाहून मोठ्या प्रमाणावर वेदना होत आहेत. याच एकाधिकारशाहीमुळे आपला देश गरीब राहिला आहे. देशाच्या नागरिकांचे भवितव्य अनिश्चित आहे.’ २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत आंग सान स्यू की यांच्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखविलेल्या नागरिकांचा हा छळ आहे, असेही ते म्हणाले. स्यू की आहेत कोठे? लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की नक्की कोठे आहेत, लष्कराच्या एकूण बंडाबाबत त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेले नाही. स्यू की यांची प्रकृती उत्तम असल्याचे तेथील लष्कराचे नेते स्थानिक माध्यमांना सांगत असले, तरीही स्यू की यांना नजरकैदेत कोठे ठेवण्यात आले आहे, हे जाहीर झालेले नाही. वाचा: ‘दुसरा पर्याय नव्हता’ ‘लष्कराकडे उठाव करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता,’ असे म्यानमारचे लष्करप्रमुख जनरल मिन आँग ह्लेइंग यांनी म्हटले आहे. लष्कराच्या अधिकृत फेसबुक पेजवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘देशासाठी हा मार्ग स्वीकारण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता आणि त्यामुळे आम्ही त्याची निवड केली. म्यानमारमधील सद्यस्थितीवर हाच निर्णय योग्य असून, त्यामुळेच देशाचे भवितव्य सुरक्षित हाती राहणार आहे,’ असे लष्कराने म्हटले आहे. ‘घोटाळ्याची चौकशी होणार’ म्यानमारमध्ये नवर्निवाचित लष्करी अधिपत्याखालील सरकारची पहिली बैठक मंगळवारी पार पडली. करोना साथरोग नियंत्रणात आणणे, गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीतील तथाकथित घोटाळ्याची चौकशी करणे, आदी मुद्द्यांवर भर देणार असल्याचे लष्कराचे प्रमुख जनरल मिन आँग ह्लेइंग यांनी स्पष्ट केले.