
बर्लिन: करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी पहिल्यांदा लस विकसित करणाऱ्या बायोएनटेक कंपनीने आता कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर लस आणणार असल्याचे म्हटले आहे. जर्मनीतील बायोएनटेकने अमेरिकेतील फायजर कंपनीसोबत करोनाची लस उत्पादित केली. जगातील अनेक देशांमध्ये फायजर-बायोएनटेक लशीचा वापर केला जात असून करोनापासून बचाव करण्यास ही लस प्रभावी असल्याचे समोर आले आहे. बायोएनटेकच्या सह-संस्थापक डॉ. ओझलेम ट्यूरेसी यांनी सांगितले की, आमचे पुढील लक्ष्य आहे. सध्या mRNA वर आधारीत असलेल्या कॅन्सरच्या काही लशी आहेत. येत्या काही वर्षात आम्ही कॅन्सरची लस विकसित करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वाचा: बायोएनटेकने करोनावर विकसित केलेली लस ही mRNA वर आधारीत आहे. डॉ. ओझलेम ट्यूरेसी (वय ५३) आणि त्यांचे पती डॉ. उगर साहीन (वय ५५) हे दोघेही बायोएनटेक कंपनीचे संस्थापक आहेत. ही कंपनी एक स्टार्टअप कंपनी आहे. कॅन्सरवरील उपचाराबाबत संशोधन सुरू असताना करोनाची साथ पसरण्यास सुरुवात झाली होती. कॅन्सरच्या उपचारासाठी वापरण्यात येणारी पद्धत त्यांनी करोनाच्या आजारासाठी वापरण्याचे ठरवले आणि त्यादृष्टीने संशोधन सुरू केले. वाचा: मागील वर्षी जानेवारी २०२० महिन्यात वुहानमध्ये करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावण्यास सुरुवात झाली. एका वैद्यकीय नियतकालिकेमध्ये करोना विषाणूबाबत प्रसिद्ध झालेले संशोधन वाचल्यानंतर त्यांना याचा धोका लक्षात आला. जर्मनीतही करोनाबाधित आढळण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांनी करोना लशीवर काम करण्यास सुरुवात केली.