धावत्या शताब्दी एक्सप्रेसमध्ये आग, आठवड्यातील दुसरी घटना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, March 20, 2021

धावत्या शताब्दी एक्सप्रेसमध्ये आग, आठवड्यातील दुसरी घटना

https://ift.tt/3qXGjJK
: नवी दिल्ली ते लखनऊ असा प्रवास करणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसला आज पहाटे आगीनं घेरलं. यामुळे रेल्वेतील प्रवासी चांगलेच धास्तावले आणि त्यांनी आरडा-ओरड सुरू केली. सुदैवानं या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. सकाळी ६.४५ वाजल्याच्या सुमारास ही रेल्वे गाझियाबाद रेल्वे स्टेशनवर दाखल झाली होती. तेव्हा या गाडीच्या पार्सल कोचमध्ये आग लागली. कोचला आग लागल्याची सूचना मिळाल्यानंतर लागलीच रेल्वेचे ज्येष्ठ अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी थोड्याच वेळात या आगीवर नियंत्रण मिळवलं. रेल्वेच्या इतर डब्यांना मात्र या आगीमुळे कोणतीही हानी झालेली नाही. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या डब्यांना हटवून रेल्वेला पुढच्या प्रवासासाठी जवळपास ८.२० मिनिटांनी रवाना करण्यात आलं. रेल्वेला आग का लागली? त्याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. सकाळी ७.०० वाजल्यादरम्यान अग्निशमन दलाला रेल्वेत आग लागल्याची सूचना मिळाली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवान करण्यात आल्या होत्या. अधिकाऱ्यांनी तातडीनं पावलं उचलत पुढचा अनर्थ टळेल, याची खात्री केली. या अगोदर १३ मार्च रोजी दिल्लीहून देहरादूनला निघालेल्या शताब्दी एक्सप्रेसच्या सी - ५ कोच आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. या अपघातातही कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.