
म.टा. प्रतिनिधी, करोनाच्या पार्श्वभूमीवर आलेली होळी बोकडाच्या मटणाला लाभदायी ठरत आहे. शहरासह ग्रामीण भागात मटणाची मागणी वाढली आहे. रविवारी शबे बारात आणि संडे स्पेशल म्हणत अनेकांनी खरेदी केले. मात्र, होळीच्या पाडव्याला म्हणजेच आज, सोमवारी या विक्रीत वाढ होण्याचा अंदाज दुकानदारांनी व्यक्त केला आहे. सध्या मटणाचा दर प्रतिकिलो ६५० रुपये आहे. होळीला सामिष भोजनाची संधी सहसा सोडली जात नाही. विदर्भात होळीचा सण दोन दिवस साजरा होतो. पहिल्या दिवशी होलिकादहन होते. तर दुसऱ्या दिवशी असते. यालाच होळीचा पाडवा असेदेखील म्हणतात. पाडव्याला चिकन, मटणची विक्री दरवर्षी होत असते. यंदा मात्र, करोनामुळे चिकनपेक्षा मटणाला अधिक पसंती दिसून येत आहे. चिकन आणि अंडी खाल्ल्याने करोना संसर्ग होत असल्याची भीती अद्याप कायम आहे. सरकार-प्रशासन चिकन, अंडी खाल्ल्याने कुठलाही संसर्ग होत नसल्याचे सांगत आहे. मात्र, त्यावर सर्वसामान्यांचा विश्वास जडलेला नाही. परिणामत: मटण विक्री तुलनेने अधिक दिसून येत आहे. त्यामुळे नागपूर आणि जिल्ह्यात शेळी, बोकडपालन करणाऱ्यांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. बोकडाचे मटण खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पारडी, इंदोरा येथील मटण मार्केट शहरात प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय, वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये मटण विक्रेत्यांची दुकाने आहेत. पण, मटण खाणारे अस्सल शौकीन जुन्या बाजारात जाऊन खरेदी करतात, हे येथे उल्लेखनीय. सिवनी, बालाघाटहून आवक अधिक नागपुरात मध्य प्रदेशातील सिवनी, बालाघाट येथून सर्वाधिक बोकडांची आवक होते. त्याशिवाय टेंभुर्णीबाजार, हैदराबाद येथूनही बोकड येत असतात. शहरातील लहान बाजारांमध्ये कळमन्यातील बोकड बाजारातून पुरवठा होतो. होळीच्या पाडव्याला कुठलाही दिवस येवो, त्याचा विचार न करता मांसाहार करणाऱ्यांची संख्या शहरात अधिक आहे. परिणामत: रविवारपेक्षा सोमवारी ही विक्री वाढण्याचा अंदाज आहे, अशी माहिती पारडी बोकड बाजारातील विक्रेते सचिन रारोकर यांनी दिली.