
म. टा. प्रतिनिधी, नागपूर वनपरिक्षेत्र अधिकारी आत्महत्या प्रकरणात वादग्रस्त ठरत असलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक यांच्या स्पष्टीकरणामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राज्य शासनाच्या आदेशांनुसार रेड्डी यांची तत्काळ बदली केली गेली नाही, तसेच त्यांनी आपले स्पष्टीकरण क्षेत्र संचालकांचे लेटरहेड वापरून केले, असा आक्षेप घेण्यात येत आहे. रेड्डी यांनी आपली बाजू मांडणारे पत्र २७ मार्च रोजी राज्याच्या वनबलप्रमुखांना पाठविले. राज्य शासनाने २६ मार्च रोजीच शिवकुमार यांचे निलंबन आणि रेड्डी यांची बदली करीत असल्याचा आदेश काढला होता. असे असताना २७ मार्च रोजी त्यांनी क्षेत्र संचालकांच्या लेटर हेडवर कसे काय स्पष्टीकरण दिले, असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरद्वारे उपस्थित केला होता. त्या अगोदर रेड्डी यांचे स्पष्टीकरण समाजमाध्यमांमधून प्रसृत झाले होते. वाघ यांच्या या आक्षेपानंतर लगेचच काही वेळाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे दुसरे पत्रही समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आले, तसेच माध्यम प्रतिनिधींपर्यंत पोहोचविले गेले. नव्या पत्रानुसार, २७ मार्च रोजी दुपारनंतर रेड्डी यांच्याकडील कार्यभार अमरावती प्रादेशिक वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला. रेड्डी यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश असताना दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत त्यांनी कार्यभार सोपविला नव्हता, हे चव्हाण यांच्या पत्रावरून स्पष्ट झाले आहे. दरम्यानच्या काळात रेड्डी यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या लेटर हेडचा उपयोग केला, असा आक्षेप वन विभागातील कर्मचारी संघटनांनी घेतला आहे. वाचा: