योद्ध्यांनाच विळखा! सोलापुरात डॉक्टर, पोलीस आणि कैद्यांना करोना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, March 29, 2021

योद्ध्यांनाच विळखा! सोलापुरात डॉक्टर, पोलीस आणि कैद्यांना करोना

https://ift.tt/3cxRyol
सूर्यकांत आसबे । सोलापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपला जीव मुठीत घेऊन रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देखील करोनाची लागण झाली आहे. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात करोना बाधितांवर उपचार करणाऱ्या ३३ आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. यामध्ये जवळपास २४ डॉक्टर तर ९ आरोग्य कर्मचारी आहेत. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी करोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्याच पद्धतीने नॉन कोविड रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर आधीच ताण वाढलेला आहे. रुग्णालयात वाढणारी गर्दी आणि रुग्णांची संख्या यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील करोनाची बाधा होत आहे. (Corona Cases In ) शासकीय रुग्णालयात सध्या ६६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ४५८ नॉन कोविड रुग्ण आहेत. तर २०४ कोरोना बाधित रुग्ण आहेत. अनेक रुग्ण गंभीर आजारामुळे शासकीय रुग्णालयात येतात. तर या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जवळपास २५० डॉक्टर सेवा बजावत आहेत. त्यातील १९३ डॉक्टर हे निवासी डॉक्टर आहेत. त्यातच आता २४ डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने उर्वरित डॉक्टरांवरील ताण आणखी वाढणार आहे. दुसरीकडे सोलापूरच्या केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी आलेल्या ४३ प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांना देखील करोनाची लागण झाली आहे. हे सर्व प्रशिक्षणार्थी १५ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी सोलापुरात आले होते. यातील काही जणांना त्रास जाणवल्याने त्यांची तापसणी करण्यात आली. सुरुवातीला ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. काही जणांचे अहवाल हे ट्रेनिंग संपल्यानंतर आल्याने त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात पाठवण्यात आले आहे. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य संजय लाटकर यांनी दिली. सांगोला तालुक्यातील तुरुंग देखील करोनाच्या विळख्यात सोलापूर जिल्ह्यात वाढणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव आता तुरुंगात देखील जाणवू लागला आहे. जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील सबजेल मधील २४ कैद्यांना लागण झाली आहे. सांगोला सबजेलमध्ये ५४ कैदी आहेत. त्यातील काही जणांना त्रास जाणवू लागल्याने तपासणी करण्यात आली होती. तपसणी करण्यात आलेल्या कैद्यांपैकी २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या कैद्यांना सबजेल मध्येच वेगळे ठेवून उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर उर्वरित कैद्यांना सबजेलमधील दुसऱ्या बराकमध्ये हलविण्यात आले आहे.