बुलंदशहर: उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एकाला शिमला येथून अटक केली आहे. आरोपीने मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिची हत्या केली आणि आपल्या घरातच तिचा मृतदेह पुरला. बुलंदशहरच्या अनुपशहर पोलिसांनी आरोपी हरेंद्र याला शिमला येथून अटक केली. १३ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी २८ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. अनुपशहरमधील एका गावात मुलीचा मृतदेह आढळला, अशी माहिती बुलंदशहरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक एस. के. सिंह यांनी दिली. मुलगी आपल्या आई आणि बहिणीसोबत शेतावर जेवत होत्या. त्याचवेळी मुलगी पाणी आणायला गेली. मात्र, ती परतलीच नाही. काल संध्याकाळी सिरौरा गावात हरेंद्र याच्या घरात खोदलेल्या खड्ड्यात मुलीचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर त्याचा मुलगा फरारी आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.