ठाणे शहरात शौचालय बांधणीत ९५ कोटींचा घोटाळा? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, March 9, 2021

ठाणे शहरात शौचालय बांधणीत ९५ कोटींचा घोटाळा?

https://ift.tt/2OyiUkH
म. टा. वृत्तसेवा, ठाणे स्वच्छ भारतचा नारा देत ठाण्यात दोन वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरात ३० शौचालय बांधण्यात येणार होती. पण ठेकेदाराने केवळ तीन ते चार शौचालय बांधत या अभियानात ९५ कोटींचा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवत काही शौचालये फूटपाथवर बांधली आहेत तर अनेक शौचालयच गायब असून त्याठिकाणी केवळ जाहिराती झळकत असल्याचे दिसून येते. दोन वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेने अंतर्गत शहरात ३० शौचालये बांधण्याचे नियोजन केले होते. ही शौचालये बांधण्यासाठी मनपाने सुवर्णा फायब्रोटेक प्रायव्हेट लि. यांना ठेका दिला होता. यावेळी १८ महिन्यांत ३० शौचालये बांधण्याबाबत करारही झाला. मात्र, दोन वर्षे लोटूनही अद्यापही केवळ चार ते पाच शौचालये बांधण्यात आली आहेत, तर निम्म्याहून अधिक शौचालये गायब आहेत. त्या जागेच्या ठिकाणी केवळ जाहिरातीच दिसून येतात. हिरानंदानी मेडोज, चिराग नगर आणि सिंघनिया शाळा या सर्व ठिकाणी शौचालये बांधण्यात येणार होती. मात्र तेथील शौचालये गायब असून केवळ जाहिरात फलकच दिसून येतात. याबाबत ठेकेदाराला जाहिरात फलक काढण्याची नोटीस देऊनसुद्धा प्रशासनाला न जुमानता जाहिराती सुरूच आहेत. तर माजीवडा येथे चक्क गटाराच्यावर पाण्याच्या प्रवाहाच्या आड जाहिरात फलक बांधण्यात आलेले आहे. प्रशासनाकडून जाहिरात फलक काढण्याचा आदेश देऊनसुद्धा ठेकेदारांना राजकीय वरदहस्त असल्याचे सांगण्यात आले. तर पोखरण रोड येथील जाहिरात फलकाचे हक्क ठाण्यातील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे आहेत. त्यामुळे याबाबत कारवाई करण्यास प्रशासनही डोळेझाक करत आहे. वर्षाला ९ लाखांचा कर ,असा एकूण १८ लाखांच्या पालिकेच्या कराचे शुल्कदेखील ठेकेदाराने बुडविले आहे. स्थायी समितीचे आदेश असूनसुद्धा जाहिरात फलक काढण्यात आले नसून यात काहीतरी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप मनसेच्या जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे.