
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई केंद्र सरकार रेमडेसिवीरबाबत १०० टक्के अन्याय करत आहेत. जेव्हा केंद्र सरकारचा हस्तक्षेप नव्हता, तेव्हा आम्हाला रेमडेसिवीर इंजेक्शन ३६ हजार मिळत होते आणि केंद्राने तो कार्यक्रम हातात घेतल्यावर ही संख्या २६ हजारांवर आली. ही २६ हजार रेमडेसिवीरदेखील वेळेवर मिळत नाहीत, अशा शब्दांत अन्न व नागरी पुवरठा मंत्री यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या करोना लस आणि रेमडेसिवीर इंजेक्शन वितरणावर मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले. 'रेमडेसिवीर काय विरोधी पक्षनेत्यांच्या घरात बनते का? त्यांना पुरवते कोण? याच देशातील फार्मा कंपन्या ते तयार करतात. उपकार करतात का ते महाराष्ट्रावर? फक्त भाजप करतेय असे ते सांगतात, पण ते काहीच करू शकत नाहीत. सर्वानी मिळून काम केले तर हा करोना आटोक्यात येणार आहे,' असेही छगन भुजबळ म्हणाले. मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर ताशेरे आढलेले आहेत. पंतप्रधानांना परदेशातील वॉशिंग्टन पोस्ट, गार्डियन, न्यूयॉर्क टाईम्ससारख्या वृत्तपत्रांनी झोडून काढलेले आहे. करोनावर उपाययोजना करण्याऐवजी पंतप्रधान कुंभमेळा अणि निवडणूक प्रचाराकडे लक्ष देत होते, अशी टीकाही त्यांनी केली. लॉकडाउनमुळे रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. काही ठिकाणी ती स्थिर होत असून वाढत नाही. लॉकडाउन वाढवला, तर आर्थिक नुकसान होणार आहे. पण कमी झालेल्या रुग्णसंख्येसाठी लॉकडाउनला नक्कीच श्रेय देता येईल, असेही ते म्हणाले. अनिल देशमुखांवरील सीबीआय कारवाईबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, 'माझ्यापासूनच सांगू शकतो, हे फक्त सूडाचे राजकारण आहे, संपूर्ण खोटेपणा, सत्यापासून दूर राहून या यंत्रणा काम करत आहेत. हे सर्व अविश्वसनीय आहे. सीबीआयने चौकशी केली म्हणजे न्याय मिळेल, हे तुम्ही आता डोक्यातून काढून टाका. आता वरून काही ऑर्डर येईल, याला अडकवा म्हणजे अटकवा, सोडा म्हणजे सोडा, असेच आहे.'