
ठाणे: संपूर्ण राज्य करोनाच्या संकटाशी झुंजत असताना दुसरीकडे राज्यातील रुग्णालयांमध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे. नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये घडलेल्या दुर्घटनांनंतर आता जिल्ह्यातही दुर्घटना घडली आहे. येथील प्राइम क्रिटीकेअर या हॉस्पिटलला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. (Fire at in , ) आज पहाटे पावणे चारच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची घटना घडली तेव्हा रुग्णालयात एकूण २६ रुग्ण होते. यापैकी चौघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आग लागल्यानंतर रुग्णालय प्रशासनानं तातडीनं हालचाल करून रुग्णांना बाहेर काढलं. रुग्णांना इतरत्र हलवताना चार जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेनं दिली आहे. आग नेमकी कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.