
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचार घेत असलेल्या दोन कैद्यांनी रात्री उशिरा कोविड सेंटरमधून धूम ठोकली. खिडकीचे गज कापून पळालेले हे दोन कैदी दरोडा आणि खुनाच्या गुन्ह्यात अटक होते. याबाबत अधिक माहिती अशी, कळंबा कारागृहातील अनेक कैद्यांना करोनाची लागण झाली होती. या कैद्यावर आयटीआय वस्तीगृहातील करोना सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या येथे ९१ कैद्यांवर उपचार सुरू असून हे सर्व कैदी विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत. काल रात्री १२ नंतर दोन कैद्यांनी खिडकीचे गज कापून तेथून पलायन केले. यामध्ये एक कैदी दरोडा प्रकरणात तर दुसरा खुनाच्या प्रकरणात शिक्षा भोगत होता. गेल्या तीन वर्षापासून हे कैदी कारागृहात होते. गोदाजी नंदिवाले व प्रतीक सरनाईक अशी या कैद्यांची नावे आहेत. रात्री उशिरा ते गज कापून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना इतर कैद्यांना त्याची कुणकुण लागली. त्यामुळे त्यांनी आरडाओरड सुरू केली. पण तोपर्यंत दोन्ही कैदी पळाले. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण, अंधाराचा फायदा घेऊन ते पळून गेले.याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्हीही कैदी हे कोल्हापूर जिल्ह्यातील असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. राज्यात करोनाचा संसर्ग वाढत असताना कोल्हापूरातही करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. विशेष, म्हणजे कोल्हापूरातील कारागृहातही करोनानं शिरकाव केला आहे. त्यामुळं अनेक कैद्यांना करोनाची लागण झाली आहे. या कैद्यांवर कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र, उपचार सुरु असताना कैद्यांचे पलायन करण्याची घटना धक्कादायक आहे, असं मत व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यातही कैद्यांनी पलायन केल्याचं समोर आलं आहे.