
वॉशिंग्टन : इस्रायल आणि गाझा पट्टीतील संघर्षात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांनी इस्रायलला पूर्णपणे समर्थन जाहीर केलं आहे. याशिवाय त्यांनी बिडेन प्रशासनाच्या कमकुवतपणावरही निशाणा साधला. आपल्या मित्रावर हल्ला होतोय आणि बिडेन प्रशासन गप्प आहे. यामुळे जग आणखी हिंस्र आणि अस्थिर होत असल्याची टीका त्यांनी केली. माझ्या कार्यकाळात शांतता प्रस्थापित झाली होती, असंही ट्रम्प म्हणाले. 'मी राष्ट्राध्यक्ष असताना आमच्या मित्रावर हल्ला झाला असता तर काय होतं ते इस्रायलच्या शत्रूला समजलं असतं', असं म्हणत त्यांनी हमासवर निशाणा साधला. अमेरिकेने ठामपणे इस्रायलच्या बाजूने उभं रहायला हवं आणि पॅलेस्टाईनला हा हिंसाचार, दहशतवाद आणि रॉकेट हल्ले थांबवा असं स्पष्टपणे सांगावं. याशिवाय आम्ही भक्कमपणे इस्रायलच्या संरक्षणासाठी पाठीशी उभं राहू, असंही अमेरिकेने स्पष्ट करावं, असं ते म्हणाले. इस्रायल आणि गाझा पट्टीतील हिंसाचारात आतापर्यंत ३५ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलमध्ये मृत्यू झालेल्यात एका भारतीय महिलेचाही समावेश आहे. इस्रायल पोलीस आणि पॅलेस्टाईन नागरिकांमध्ये जेरुस्लेममधील अल अक्सा या मशिदीत बाचाबाची झाली होती. यानंतर हमासने अत्यंत टोकाची भूमिका घेत इस्रायलवर थेट रॉकेट हल्लेच सुरू केले. दरम्यान, अमेरिकेने मंगळवारी पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोन्ही गटांना शांततेचं आवाहन केलं आहे. पण इस्रायललाही आपलं संरक्षण करण्याचा अधिकार असल्याचंही अमेरिकन राज्य विभागाचे प्रवक्ते नेड प्रिस यांनी सांगितलं.