
मुंबई : करोनाचा धोका एकीकडे वाढत असताना दुसरीकडे राज्यातील मंत्र्यांची उधळपट्टी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी तब्बल ६ कोटी खर्च करण्यात येणार आहेत. अजित पवारांचं सोशल मीडिया हातळण्यासाठी एका कंपनीला नेमण्यात येणार असून त्यासाठी ६ कोटींची तरदूत करण्यात येणार आहे. आधीच करोनाच्या संकटामध्ये अर्थव्यवस्था ढासळली असताना या बातमीमुळे नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे. अधिक माहितीनुसार, सोशल मीडियावर आपली प्रसिद्धी वाढवण्यासाठी आणि घेतलेले सर्व निर्णय नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजित पवारांच्या सोशल मीडियाला ६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर यासाठी एका बाह्य कंपनीची नेमणूक करण्यात आली असून ही कंपनी आता पवारांचं मीडिया अकाऊंट हाताळणार आहे. मविआ सरकारकडून सोशल मीडियाच्या खर्चासाठी ६ कोटी रुपयांची मंजूरीही देण्यात आली आहे. यामध्ये ट्विटर, फेसबूक, यूट्यूब, इन्स्टाग्राम अशा सोशल माध्यमांवर सरकार आणि पक्षाने घेतलेले निर्णय तातडीने पोस्ट करण्यासाठी आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. फक्त अजित पवारच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही सोशल मीडियासाठी पैसे खर्च केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या सगळ्यावर विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. राज्यात आपले जनसंपर्क कार्यालय असतानाही बाह्य कंपनीला पीआर देण्यात आला. म्हणजे आपल्या तरुणांना नोकरीच्या संधी देता आल्या नाही का? असाही सवाल विरोधी पक्षातून विचारण्यात आला आहे. करोनाच्या जीवघेण्या संकटामध्ये लोकांवर उपाशी राहण्याची वेळ आली असताना राज्याचे नेतेच जर फक्त सोशल मीडियासाठी ६ कोटी खर्च करणार असतील तर सर्वसामान्य जनतेचं काय होणार? असाच प्रश्न समोर येतो.