मुंबई : मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईला कोणताही धोका नसला तरी हवामान विभागानं मुंबई व परिसराला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईला वादळाचा धोका नसला तरी हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने त्याच्या प्रभावाने मुंबईत पाऊस होण्यासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट व तर, रायगडला रेड अलर्ट देण्यात आला आहे. - चक्रीवादळामुळे आज लसीकरण बंद करण्यात आलं आहे. - पुढच्या ३ तासांमध्ये 75-85 ताशी किमी. वेगाने वारे वाहणार असून पाऊसही मुसळधार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. - नाशिमध्येही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरूवात, नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना - रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाला फटका बसला आहे. इथं वाकेडला महामार्गावरील मोरी खचल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. - मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत 34 ठिकाणी झाडं कोसळली आहे. पण सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. - मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळील समुद्र खवळला, मोठ्या लाटांसह पावसाला सुरवात - पालघरमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून वाऱ्याचा वेगही जास्त आहे. - भिवंडीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी पाणी साचलं - मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वाशी, पनवेल आणि कळंबोलीतही पावसाची रिमझिम - साताऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात, पाचगणी, वाई, महाबळेश्वरला फटका, विजेच्या तारा तुटल्यानं वीजपुरवठा खंडित