नवी दिल्ली : देशाच्या दक्षिण-पश्चिम राज्यांवर 'तौत्के' चक्रीवादळाच्या प्रकोपाची टांगती तलवार कायम आहे. केरळ, कर्नाटक आणि गोव्यात हाहाकार उडवून दिल्यानंतर आता तौत्के वादळ गुजरातच्या दिशेनं वाटचाल करतंय. या वादळाचा प्रभाव पश्चिम तटासहीत राजस्थान, दिल्ली आणि उत्तराखंडातही दिसून येऊ शकतो. अधिक वाचा : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या समुद्रकिनारी भागात आज आणि उद्या मोठ्या प्रमाणात पावसाची शंका आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफच्या ५० टीम्स तैनात करण्यात आल्या आहे. गुजरातच्या भागालाही अलर्टचा इशारा देण्यात आलाय. सोबतच किनाऱ्यावर राहणाऱ्या मच्छिमारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ १७ मे (सोमवारी) रात्री किंवा १८ मे रोजी सकाळी गुजरातच्या तटांना धडक देऊ शकतं. येत्या २४ तासांत हे चक्रीवादळ अत्यंत भयंकर रुप धारण करू शकतं, असा इशाराही हवामान विभागानं दिलाय. १८ मे रोजी सकाळी चक्रीवादळ तौक्ते पोरबंदर आणि महुआ दरम्यान गुजरातच्या तटांना धडक देत पुढे सरकू शकतं. तौत्के वादळात आतापर्यंत आठ जणांनी आपले प्राण गमावलेत. सोबतच, अनेक घरांनाही नुकसान झालंय. या चक्रीवादळाच्या वादळामुळे उद्भवणार्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याची सूचना आरोग्य कर्मचार्यांना देण्यात आलीय. वादळाची तीव्रता लक्षात घेता रुग्णालयांचा वीजपुरवठा, ऑक्सिजन पुरवठा, कोविड केअर युनिटवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोविड १९ रुग्णांवर उपचार करणार्या रुग्णालयांना विजेचा बॅकअप सुनिश्चित करण्याची सूचना सरकारकडून करण्यात आलीय. १६ मालवाहू विमान आणि वायुसेनेची १८ हेलिकॉप्टरही तयार आहेत. महाराष्ट्रातल्या मुंबई, उत्तर कोकण, ठाणे आणि पालघरच्या काही भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.