अकोला : अकोला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत स्वराज्यभवन येथे काँग्रेसच्या झालेल्या बैठकीत बहुतांश नेते आणि पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र, एक प्रवाह आघाडी करूनच निवडणूक लढण्याच्या बाजूला होता त्यामुळे आता महाविकास आघाडीशी चर्चा करून अंतिम निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. तसेच नेत्यावर सर्कल निहाय जबाबदारी सोपवली असून ते उमेदवारांच्या चाचणीसह पक्षांच्या राजकीय स्थितीचा ही आढावा घेणार आहे. जानेवारी 2020 मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 53 पैकी काँग्रेसचे चार सदस्य निवडून आले होते. भाजप आघाडीने दोन अपक्षांना आघाडीत सामील करून घेतले होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वेळी 7 सदस्य असलेल्या भाजपने सभागृहात बहिर्गमन केले आणि वंचितचा विजय झाला होता. कधी नव्हे ते वंचितने संपूर्ण सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले होते. आता चौदा जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. पण काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले हे अकोल्यात आले होते आणि स्वबळाचा नाराही दिला होता. त्यामुळे या निडणुकीत महाविकास आघाडीसोबत जातात की स्वबळावर लढतात हे तर मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत ठरणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामीण भागात शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या तुलनेत काँग्रेस राजकीयदृष्ट्या कमकुवत आहे. त्याच चेहऱ्यांना कोणत्या तरी निवडणुकीत संधी देण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून होत आहे. आघाडी केल्यास काँग्रेसच्या वाटेवर जागा कमी येतात. त्यामुळे स्वराज्य भवन येथे झालेल्या बैठकीत अनेकांकडून 'एकला चलो रे'चा नारा ऐकण्यास मिळाला. झालेल्या बैठकीत उपस्तीत नेत्यांकडून जिल्हा परिषदेत सदस्य संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्षांनीच दिला होता स्वबळाचा नारा लोकसभा व विधानसभा निवडणुका शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याचे संकेत खा. शरद पवार यांच्याकडून अनेकदा देण्यात येत असले तरी स्थानिक व विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे विधान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 11 जून रोजी अकोल्यात स्वराज्य भवन येथे पत्रकार परिषदेत केले होते. त्यामुळे त्याच स्वराज्य भवन येथे स्थानिक निवडणुकीत 'एकला चलो रे' चा नारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला. परिणामी आता आघाडी होईल की नाही, हे मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.