भारताच्या गोलंदाजांनी झुंजवले, पण श्रीलंकेने सामन्यासह मालिकाही जिंकली... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 30, 2021

भारताच्या गोलंदाजांनी झुंजवले, पण श्रीलंकेने सामन्यासह मालिकाही जिंकली...

https://ift.tt/2WyODWS
कोलंबो : तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी यावेळी श्रीलंकेला चांगलेज झुंजवले. राहुल चहरने तीन विकेट्स मिळवल्या होत्या, पण भारताला प्रथम फलंदाजी करताना यावेळी श्रीलंकेपुढे ८२ धावांचे माफक आव्हान ठेवता आले होते. त्यामुळेच श्रीलंकेला या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग करता आला. त्यामुळेच श्रीलंकने आजचा सामना जिंकत मालिका विजयही २-१ असा साकारला. शिखर धवनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, पण धवनच पहिल्या षटकात बाद झाला. धवनला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. धवन बाद झाल्यावर भारताचे देवदत्त पडीक्कल, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, नितीष राणा हे फलंदाज एकामागून एक बाद होत गेले आणि भारतीय संघ अडचणीत सापडला. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादव यांनी काही काळ धावा जमवण्याचा प्रयत्न केला खरा, पण भुवनेश्वर आऊट झाला आणि ही जोडी फुटली. त्यामुळेच भारतीय संघ यावेळी चांगली धावसंख्या उभारू शकला नाही. भारताकडून यावेळी सर्वाधिक २३ धावा या कुलदीप यादवने फटकावल्या. आज आपल्या वाढदिवशीच वायनाडू हसरंगाने नेत्रदीपक कामगिरी करत भारताचे कंबरडे मोडले. कारण आजच्या सामन्यात हसरंगाने सर्वाधिक चार विकेट्स मिळवले आणि त्यानंतरच भारताचा डाव गडगडला. त्यामुळे भारताच्या धावसंख्येला यावेळी हसरंगाने चांगली वेसण घातल्याचे पाहायला मिळाले. भारताने श्रीलंकेपुढे यावेळी ८२ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान श्रीलंका सहज पार करेल, असे वाटत होते. पण यावेळी भारताचा फिरकीपटू राहुल चहरने अचूक आणि भेदक मारा केला आणि श्रीलंकेच्या फलंदाजांना चांगलेच नाचवले. पण राहुलला यावेळी दुसऱ्या गोलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे भारतीय संघाला गोलंदाजी करत असताना सामन्यावर पकड मिळवता आली नाही. त्यामुळेच हा सामना भारताच्या हातून निसटला. दुसरीकडे श्रीलंकेला हे आव्हान माफक असल्याचे माहिती होते, त्यामुळे त्यांनी कोणतीही घाई केली नाही. संयतपणे फलंदाजी करत यावेळी श्रीलंकेने सहजपणे भारताचे ८२ धावांचे आव्हान लीलया पेलले.