
काबूल: तालिबानविरोधातील युद्धात पराभवाच्या छायेत असलेल्या अफगाणिस्तान सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील या आणखी एका महत्त्वाच्या शहरावर तालिबानने ताबा मिळवला आहे. तालिबानने काबूल भोवती आपला विळखा घट्ट केला आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी तालिबानसोबत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. मजार-ए-शरीफ हे बल्ख प्रांताची राजधानी आहे. तालिबानच्या हल्ल्याचा अफगाण सैन्याने जोरदार प्रतिकार केला. मात्र, घनघोर संघर्षात अफगाण सैन्याची पिछेहाट झाली. 'असोसिएटेड प्रेस' या वृत्तसंस्थेला एका अफगाण अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने मजार-ए-शरीफमधील आपले वाणिज्य दूतावास बंद केले होते. दूतावासातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना तातडीने मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले होते. तालिबानने मागील काही दिवसांमध्ये जोरदार हल्ले सुरू केले आहेत. आतापर्यंत १८ प्रातांच्या राजधानींवर तालिबानने ताबा मिळवला आहे. उत्तरेकडील बल्ख प्रांताच्या राज्यपालांचे प्रवक्ते मुनीर अहमद फरहाद यांनी सांगितले की, तालिबानींनी शनिवारी पहाटे मजार-ए-शरीफवर चारही बाजूंनी हल्ला केला. यामुळे अफगाण सैन्य आणि त्यांच्या शहराच्या बाहेरील भागांत जोरदार संघर्ष झाल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्यात जीवितहानी किती झाली, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. अमेरिका आणि नाटो सैन्याच्या संपूर्ण माघारीला तीन आठवड्यांहून कमी कालावधी उरला असतानाच तालिबानने उत्तर, पश्चिम व दक्षिण अफगाणच्या बहुतांश भागावर कब्जा केला आहे. त्यांनी दक्षिणेकडील प्रांत पूर्णपणे ताब्यात घेतला असून, त्यात राजधानी लोगारचाही समावेश आहे. काबूलच्या एका जिल्ह्यातही तालिबानींनी प्रवेश केला आहे, तर त्यांच्या फौजा काबूलच्या दक्षिणेकडे ८० किमीपर्यंत पोहोचल्या आहेत, असे लोगारच्या खासदार होदा अहमदी यांनी सांगितले. राष्ट्रपती गनी यांचे देशाला उद्देशून भाषण अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या वाढत्या दहशतीच्या वातावरणात राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देशाला उद्देशून भाषण केले. देशात पुन्हा एकदा अस्थिरतेचा धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी म्हटले. अफगाणिस्तानवर आलेल्या संकटाला रोखण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी नागरिकांना दिला. देशाला उद्देशून केलेल्या भाषणात राजीनाम्याबाबत त्यांनी काहीही भाष्य केले नाही. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींच्या भाषणाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते. गनी यांनी म्हटले की, अफगाण सुरक्षा दलाला पुन्हा एकत्र संघटीत करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यांनी पुढे म्हटले की, राष्ट्रपती म्हणून अस्थिरता, हिंसा आणि विस्थापनला रोखण्यासाठी प्रयत्न देण्यात येणार आहे. मजार-ए-शरीफ शहरावर तालिबानने ताबा मिळवण्याआधीची स्थिती