
नवी दिल्ली : आज देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमधील पदक विजेत्या खेळाडूंचाही उल्लेख केला. तसेच त्यांच्या सन्मानार्थ स्वत: टाळ्याही वाजवल्या. पंतप्रधान म्हणाले की, 'आपल्या खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकून देशाचे नाव उंचावले आहे. आज देशाच्या अनेक भागात पूर आहे, काही दुःखद घटना घडत आहेत. या दरम्यान भारताची युवा पिढी, ज्यांनी देशाचे नाव उंचावले आहे, ते आपल्यामध्ये बसले आहेत. मी सर्व देशवासियांना खेळाडूंसाठी पुढे येऊन त्यांच्यासाठी टाळ्या वाजविण्याचे आव्हान करतो. संपूर्ण देशाने त्यांना सलाम करावा, अशी माझी इच्छा आहे,' असे म्हटल्यानंतर पंतप्रधानांनी स्वतः पुढे येऊन खेळाडूंच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवल्या. लाल किल्ल्यावर झालेल्या या कार्यक्रमात टोकियो ऑलिम्पिकचे सर्व पदक विजेते खेळाडू उपस्थित होते. यात भालाफेकपटू सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा, बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, वेटलिफ्टर मीराबाई चानू, भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघातील खेळाडू यांचा समावेश आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताची आतापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने चमकदार कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी एकूण 7 पदके जिंकली. यामध्ये 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्यपदकांचा समावेश आहे. ट्रॅक अँण्ड फील्डमध्ये पहिल्यांदाच भारताला पदक मिळाल्याने यंदाच्या ऑलिम्पिकचं वेगळं महत्व आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा सुवर्ण जिंकण्यात यशस्वी झाला. त्याच्याशिवाय वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि पैलवान रवीकुमार दहिया यांनी रौप्य पदक पटकावले. तर 41 वर्षानंतर भारतीय पुरुष हॉकी संघ देखील पदक जिंकण्यात यशस्वी झाला. हॉकी संघाने कांस्य पदकावर नाव कोरले. पी.व्ही. सिंधू (बॅडमिंटन), लवलिना बोर्गोहेन (बॉक्सिंग) आणि बजरंग पुनिया (कुस्ती) यांनीही कांस्य पदके जिंकली. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने यापूर्वी सर्वाधिक 6 पदके जिंकली होती. दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकवर पंतप्रधान मोदींची नजर होती. ते खेळाडूंच्या संपर्कात होते. पदक जिंकणाऱ्या अनेक खेळाडूंना त्यांनी स्वतःला फोन करून अभिनंदन आणि कौतुक केले. त्याचबरोबर जे खेळाडू पदक जिंकण्यात अपयशी ठरले त्यांनाही प्रोत्साहन देत त्यांचा आत्मविश्वास वाढवला.