
ट्रेंट ब्रिज : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ चांगलाच रंगतदार झाला. भारताच्या फलंदजांनी यावेळी लढाऊ बाणा दाखवत चांगली कामगिरी केली. पावसामुळे यावेळी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला असला तरी भारताने या सामन्यात भक्कम आघाडी घेतली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताला १५ धावांत चार जोरदार धक्के बसले होते. आजच्या दिवसाची सुरुवातही पावसामुळे थोडी संथ झाली. गुरुवारी ४ बाद १२५ या धावसंख्येवरून भारताने आज आपला डाव सुरु केला. पण भारताला काही वेळातच रिषभ पंतच्या रुपात पाचवा धक्का बसला. पंतला यावेळी २५ धावा करता आल्या. पण पंत बाद झाल्यावर लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्यांमध्ये चांगली भागीदारी झाल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी भारताला दोनशे धावांचा टप्पा गाठून देत संघाला आघाडीही मिळवून दिली. या राहुल आणि जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी ६० धावांची अनमोल भागीदारी रचली. ही जोडी आता मोठी धावसंख्या उभारेल आणि राहुल शतक पूर्ण करेल, असे वाटत होते. पण जेम्स अँडरसनने राहुलला बाद केले आणि ही जोडी फोडली. राहुलने यावेळी १२ चौकारांच्या जोरावर ८४ धावांची सर्वाधिक खेळी साकारली. राहुल बाद झाल्यावर जडेजाने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि आक्रमक फलंदाजी केली. जडेजाने यावेळी आपले अर्धशतकही पूर्ण केले. जडेजा यावेळी शतक झळकवणार, अशी आशा काही जणांना होती. पण अर्धशतक झळकावल्यावर जडेजाला जास्त धावा करता आल्या नाहीत. जडेजाने आठ चौकार आणि एका षटकारासह ५६ धावांची खेळी साकारली. जडेजा बाद झाल्यावर जसप्रीत बुमराने २८ आणि मोहम्मद शमीने १३ धावा करत भारताची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारताला पहिल्या डावात २७८ धावांपर्यं मजल मारता आली. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या सलामीवीरांनी सावध पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा इंग्लंडची बिनबाद २५ अशी स्थिती होती. त्यामुळे भारतीय संघाकडे अजूनही ७० धावांची भक्कम आघाडी आहे.