नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांनी आज घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात वाढ करून सवर्सामान्यांना झटका दिला आहे. आजपासून सिलिंडरच्या दरात २५ रुपये वाढ झाली. सलग तिसऱ्या महिन्यात कंपन्यांनी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली तर १ जानेवारीपासून घरगुती वापराचा अनुदानित सिलिंडर १९० रुपयांनी महागला आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत १४.२ किलोचा अनुदानित घरगुती सिलिंडरचा भाव ८८४.५० रुपये झाला आहे. नवी दिल्लीमध्ये सिलिंडरचा भाव रुपये ८८४.५० रुपये झाला आहे. १५ दिवसांत कंपन्यांनी दुसऱ्यांदा दरवाढ केली. कोलकात्यात सबसिडीवाल्या घरगुती सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ झाली असून त्याचा भाव ९११ रुपये झाला आहे. देशभरातील हा सर्वाधिक दर आहे. चेन्नईत सिलिंडर ९००.५० रुपये झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या सात वर्षात घरगुती गॅसची किंमत दुपटीने वाढली आहे. मार्च २०१४ मध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ४१०.५ रुपये होती. गेल्या महिन्यात कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल ७३.५० रुपयांची वाढ केली होती. मुंबईत आणि दिल्लीत घरगुती वापराच्या सिलिंडरचा दर ८३४.५० रुपये झाला होता. याआधी पेट्रोलियम कंपन्यानी १ जुलै रोजी घरगुती वापराच्या १४.२ किलो ग्रॅमच्या गॅस सिलींडरच्या किमतीत २५.५० रुपयांची वाढ केली होती. वाणिज्य वापराच्या सिलिंडरमध्ये देखील आजपासून ७५ रुपयांनी महागला आहे.आज १ सप्टेंबरपासून देशभरात वाणिज्य वापराचा १९ किलोचा गॅस सिलिंडर ७५ रुपयांनी महागला आहे. मुंबईत १९ किलोचा गॅस सिलिंडर १६५४.५० रुपये झाला होता. दिल्लीत तो १६९८.५० रुपये झाला होता. चेन्नईत त्याची किंमत १८३६ रुपये तर कोलकात्यात १९ किलोचा गॅस सिलिंडर १६९८ रुपयांवर गेला होता. या याआधी १७ आॅगस्ट २०२१ रोजी कंपन्यांनी वाणिज्य वापराच्या सिलिंडरच्या किंमतीत ६८ रुपयांची वाढ केली होती. १७ आॅगस्टच्या दरवाढीनंतर मुंबईत १९ किलोचा गॅस सिलिंडर १५७९.५० रुपये झाला होता. दिल्लीत तो १६२३.५० रुपये झाला होता. चेन्नईत त्याची किंमत १७६१ रुपये तर कोलकात्यात १९ किलोचा गॅस सिलिंडर १६२३ रुपयांवर गेला होता.