न्यूयॉर्क: अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत रशियाच्या डेनिल मेदवेदेवने जागतिक क्रमवारीतील अव्वल सर्बियाच्या नोवाक जोकोव्हिचचा पराभव करून विजेतेपद पटकावले. मेदवेदेवने जोकोव्हिचचा ६-४, ६-४,६-४ असा पराभव करत पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवले. या पराभवामुळे जोकेव्हिचचे विक्रमी ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले. वाचा- जोकोव्हिच विक्रमी २१वे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरला होता. पण अंतिम सामन्यात तो लयीमध्ये दिसला नाही. सलग तीन सेटमध्ये त्याचा पराभव झाला. दुसऱ्या बाजूला तिसऱ्यांदा ग्रँड स्लॅम फायनलमध्ये पोहोचलेल्या २५ वर्षीय मेदवेदेवने करिअरमधील पहिले ग्रँड स्लॅम विजेतपद मिळवले. या वर्षी सुरुवातीला तो ऑस्ट्रेलिया ओपनच्या फायनलमध्ये पोहोचला होता. तेथे नोवाकने त्याचा पराभव केला. पण आता वर्षाच्या अखेरच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत मेदवेदेवने बाजी मारली आणि नोवाकला इतिहास घडवण्यापासून रोखले. वाचा- या सामन्यात जर नोवाकने विजय मिळवाल असता तर तो पुरुषांमध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवणारा खेळाडू झाला असता. पण रशियाच्या डेनिल मेदवेदेवने त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. सध्या जोकेव्हिच, रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे प्रत्येकी २० ग्रँड स्लॅम स्पर्धेसह पहिल्या स्थानावर आहेत. वाचा- जोकोव्हिचने या वर्षी ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि विंबल्डनचे विजेतेपद मिळवले होते. जर अमेरिकन ओपनचे विजेतेपद मिळवले असते तर एका वर्षात चारही ग्रँड स्लॅम जिंकण्याचा विक्रम त्याने केला असता. पुरुषांमध्ये एका वर्षात चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याची कामगिरी रॉड लेव्हर यांनी केली होती. त्यांनी १९६२ आणि १९६९ साली अशी विक्रमी कामगिरी केली होती. तर महिलांमध्ये स्टेफी ग्राफने १९८८ साली केली होती. वाचा- ३४ वर्षीय जोकोव्हिच करिअरमध्ये ३१व्यांदा तर अमेरिकन ओपनमध्ये नवव्यांदा फायनलमध्ये पोहोचला होता. ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचण्याबाबत त्याने फेडररशी बरोबरी केली आहे.