हिंदी-पॅसिफिक महासागरात चीनला वेसण घालणार; 'क्वाड' गटाचा निर्धार! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 25, 2021

हिंदी-पॅसिफिक महासागरात चीनला वेसण घालणार; 'क्वाड' गटाचा निर्धार!

https://ift.tt/3kHMSjP
वॉशिंग्टन: अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश असलेल्या क्वाड गटाची बहुप्रतिक्षित बैठक व्हाइट हाउसमध्ये पार पडली. हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर क्षेत्रात चीनच्या विस्तारवादी धोरणाला वेसण घालण्यासाठी आणि या भागामध्ये परस्पर सहकार्य, जागतिक शांततेसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार क्वाड गटाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. क्वाड गटाच्या बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा हे सहभागी झाले होते. क्वॉड गटाच्या बैठकीची सुरुवात जो बायडन यांनी केली. त्यांनी म्हटले की, जगासमोर अनेक आव्हाने आहेत. मात्र, क्वाड एकत्र येऊन या आव्हानांचा सामना करू शकतो. या गटात लोकशाही देशांचा समावेश असून संपूर्ण जगासाठी एक सामायिक विचार करत आहेत. या गटाची एक दूरदृष्टी असून भविष्याचा विचार केला जात आहे. सर्व एकत्रितपणे आव्हानांचा मुकाबला करू शकतो. क्वाड बैठकीत पंतप्रधान मोदी काय म्हणाले? क्वाड गटाच्या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वाड गटाचे महत्त्व अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सुनामीमुळे उद्धवस्त झालेले जनजीवन पुन्हा सुरळीत करण्यासाठी क्वाड देश एकजूट झाले होते. त्यावेळी सर्व प्रकारची मदत, सहकार्य करण्यात आले होते. सध्या संपूर्ण जग करोना महासाथीच्या आजाराशी दोन हात करत आहे. या स्थितीतही जगाच्या मदतीसाठी क्वाड देश सक्रिय आहे. क्वाड देशांना हिंदी महासागर-पॅसिफिक महासागर या क्षेत्रात एकत्रपणे काम करावे लागणार असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. सर्वांना सोबत घेऊनच जगात शांतता स्थापित करणे, समृद्धीकडे वाटचाल करणे हा क्वाड देशाचा उद्देश असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी म्हटले की, हिंदी-पॅसिफिक महासागर क्षेत्र स्वतंत्र आणि मजबूत राहिला तरच या क्षेत्राचा विकास शक्य आहे. मॉरिसन यांच्यानंतर जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनीदेखील आपली भूमिका मांडली.