नवी दिल्लीः पश्चिम बंगालची खाडी आणि राजस्थानमध्ये बनलेल्या कमी दाब्याच्या पट्ट्यामुळे मध्य भारतात मान्सून सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने आता पुढील तीन दिवसांचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्र आणि कोकण, गुजरात, मध्य प्रदेश ओडिशा आणि छत्तीसगडमधील काही भागांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान विभागाने ताजे बुलेटीन जारी केले आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कोकण, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने सोमवारसाठी ( १३ सप्टेंबर ) दिला आहे. याशिवाय विदर्भ, उत्तराखंड, पूर्व राजस्थान, मराठवाडा, झारखंड आणि दिल्लीतही मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसासह वेगवान वारे वाहतील आणि त्यांचा वेग हा ४५ ते ५५ किमी प्रति तास इतका असेल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. हवामान विभागाने मंगळवारचा (१४ सप्टेंबरचा ) अंदाज दिला आहे. मध्य महाराष्ट्र, पूर्व मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय उत्तराखंड, पूर्व राजस्थान, मध्य मध्य प्रदेश, अंदमान निकोबार, ओडिसा, छत्तीसगड आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या दिवशी वेगवान वारे आणि वीज कोसळण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. १५ सप्टेंबरला बुधवारी उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात, मध्य मध्य प्रदेश या भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे. याशिवाय उत्तराखंड, छत्तीसगड आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागाने अंदाजात म्हटलं आहे. १५ तारखेला बुधवारी रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरसाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि विदर्भातील वर्धा जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. ऑरेंज अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमधील स्थानित अधिकाऱ्यांना मुसळधार पावसामुळे होणाऱ्या कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
https://ift.tt/2YQjrDC