जगाच्या बाजारपेठेत सोलापुरी ब्रँड; प्रिसिजनने बनवली ईव्ही रेट्रोफिटेड बस - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 23, 2021

जगाच्या बाजारपेठेत सोलापुरी ब्रँड; प्रिसिजनने बनवली ईव्ही रेट्रोफिटेड बस

https://ift.tt/3lOgBqn
: जगभरातील नावाजलेल्या वाहन उत्पादकांना कॅमशाफ्ट्सचा पुरवठा करणाऱ्या प्रिसिजन उद्योगसमुहाने भारतात पहिली मध्यम आकाराची रेट्रोफिटेड बनवली आहे. वाहन उद्योग क्षेत्रातील ही अत्यंत ऐतिहासिक घटना आहे. वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न जगभरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रिसिजन उद्योगसमुहाने मोठं पाऊल टाकलं आहे. प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक करण शहा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी कंपनीचे चेअरमन यतिन शहा उपस्थित होते. प्रिसिजनने डिझेलवर चालणाऱ्या २३ आसन क्षमतेच्या प्रवासी बसचे रूपांतर इलेक्ट्रिक बसमध्ये केलं आहे. मध्यम आकाराची प्रवासी बस इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतरित होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. ही वातानुकूलित बस एका चार्जिंगमध्ये १८० किलोमीटर धावेल. प्रिसिजनची इलेक्ट्रिक व्हेईकल टीम वर्षभर या प्रोजेक्टवर पुणे येथे काम करत होती. यासाठी पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) संस्थेने या बसचे टेस्टिंग करत प्रिसिजनला सहकार्य केले. या बसचं लवकरच शासनासमोर सादरीकरणही केलं जाणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय पुढे येत आहे. मात्र संपूर्ण नवे इलेक्ट्रिक वाहन बनवण्याचा खर्च मोठा असतो. त्यामुळे जुन्या वाहनाचे 'रेट्रोफिटिंग' ही संकल्पना पुढे आली. यामध्ये वाहनाचे इंजिन काढून त्याला इलेक्ट्रिक ड्राईव्हलाईन बसवली जाते. अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी सुरुवातीची गुंतवणूक मोठी असली तरी ऑपरेटिंग कॉस्ट खूप कमी असणार आहे. प्रिसिजनने मे २०१८ मध्ये नेदरलँड्समधील 'इमॉस मोबील सिस्टिम्स बी. व्ही.' ही इलेक्ट्रिक ड्राईव्हलाईन उत्पादक कंपनी संपादित केली. इमॉसमुळे प्रिसिजन समूहाकडे इंधनावर चालणाऱ्या वाहनाचे इलेक्ट्रीफिकेशन करण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले. इमॉसने आतापर्यंत ६०० पेक्षाही अधिक जड वाहनांचे इलेक्ट्रिफिकेशन केल आहे. त्यानंतर ही वाहने एकूण १६ कोटी किलोमीटर्सपेक्षाही अधिक अंतर यशस्वीरीत्या धावली आहेत, असंही करण शहा यांनी सांगितलं आहे.