आघाडीचा निर्णय परिस्थितीनुसारच; राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मोठा निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 1, 2021

आघाडीचा निर्णय परिस्थितीनुसारच; राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मोठा निर्णय

https://ift.tt/3Bw2kou
म. टा. विशेष प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडी करताना त्या-त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती ध्यानात घेऊन नंतरच आघाडी करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीत मंगळवारी एकमत झाल्याचे समजते. विशेष म्हणजे केंद्रातील भाजपचे सरकार सूडबुद्धीने वागत असल्याने ईडी, सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणांपासून सांभाळून राहण्याचा सल्ला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याचे सांगण्यात आले. शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक 'सह्याद्री' या सरकारी अतिथीगृहात पार पडली. यात प्रामुख्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस वा शिवसेनेसोबत आघाडी करताना त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मगच निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले. ओबीसीचा मुद्द्यावर जोपर्यंत मार्ग निघत नाही, तोपर्यंत निवडणुका घ्यायच्या नाहीत यावरही यावेळी पुन्हा शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. या बैठकीत पालकमंत्री, संपर्कमंत्र्यांच्या आणि जिल्ह्यजिल्ह्यातील कामाचा आढावा घेण्यात आला. बैठकीत भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानेही चर्चा झाली. या यात्रेच्या माध्यमातून आघाडीवर टीका करणाऱ्या भाजपविरोधात नेमका कसा प्रचार करायला हवा, यावर विचारमंथन झाले. दुसरे म्हणजे केंद्रातील सरकारचा राज्यातील आघाडी सरकारच्या मंत्र्यांविरोधात तपास यंत्रणांचा ससेमिरा लावण्याचा राजकीय अजेंडा आहे. त्यामुळे या यंत्रणांपासून थोडे सावध राहण्याचा सल्ला, या वेळी पवार यांनी दिल्याचे समजते.