नवे पुणे वसविण्याची योजना; नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 25, 2021

नवे पुणे वसविण्याची योजना; नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

https://ift.tt/3uaLF7v
म. टा. प्रतिनिधी, 'पुणे-बेंगळुरू दरम्यान ४० हजार कोटी रुपये खर्च करून नवा महामार्ग विकसित केला जाणार आहे,' अशी घोषणा केंद्रीय यांनी शुक्रवारी केली. फलटणमार्गे जाणाऱ्या या महामार्गालगत नवीन पुणे वसवणे शक्य होईल, असा दावाही त्यांनी केला. 'पुण्यातील कोंडी आणि गजबजाट दूर करण्यासाठी विकेंद्रीकरण हाच पर्याय असून सुसज्ज रस्ते व मेट्रोद्वारे नव्या पुणेला जोडणे शक्य होणार आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले. नव्या महामार्गाच्या घोषणेद्वारा नव्या पुण्याचे स्वप्न गडकरींनी पुणेकरांना दाखवले आहे. राजाराम पूल ते 'फन टाइम थिएटर'पर्यंत बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. 'पुण्यातील मेट्रो, चांदणी चौक उड्डाणपूल आणि विमानतळाचे विस्तारीकरण अशा अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांना गेल्या काही वर्षांत गती देऊ शकलो, याचे समाधान वाटते,' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. पुण्यासह राज्यातील विविध प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी निधीची कोणतीही कमतरता नसून केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली. तळेगाव, वाघोली व शिरूर दरम्यान बहुमजली पूल उभारण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला, तर नगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर हा पुण्यालगतचा परिसर कमी खर्चांत 'ब्रॉडगेज मेट्रो'द्वारे जोडण्याची संकल्पना पुन्हा मांडली. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार उपस्थित होते. महापौर मुरलीधर मोहोळ अध्यक्षस्थानी होते. 'नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने ठेकेदार आणि पालिकेने वेळेत विकास कामे पूर्ण करावी,' अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली. 'महामार्गांसाठी जमीन द्यायला पूर्वी विरोध व्हायचा; पण किमती वाढल्याने लोक आता दादा आमच्या शेतातून रस्ता न्या, अशी मागणी करू लागले,' असे अजित पवार यांनी सांगताच एकच खसखस पिकली. 'फलक लावणाऱ्यांकडून विकासकामांसाठी काही लाख रुपये घेतले पाहिजे. फलक उडून जातील; पण विकासकामांमुळे नाव कायम राहील,' असा टोला गिरीश बापट यांनी नगरसेवकांना लगावला. 'मुंबईतून बारा तासांत दिल्ली' 'दिल्ली-मुंबई महामार्ग बांधण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील काम सुरू व्हायचे आहे. हा महामार्ग नरिमन पॉइंटपाशी संपेल. तेथून बारा तासांत दिल्लीला जाता येईल. माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या जवळचा वांद्रे-वरळी सागरी सेतू वसई-विरारपर्यंत वाढवता येईल,' अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.