म. टा. विशेष प्रतिनिधी, करोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी मुंबईमध्ये वेगाने लसीकरणाची प्रक्रिया सुरू असली तरी मुंबईमध्ये येऊन लसीकरण करणाऱ्यांचे प्रमाण साधारण दहा टक्के असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईतील ज्या गटांमध्ये लसीकरणाचे उदिष्ट्य साध्य झालेले नाही त्यांच्यामध्ये लसीकरण अधिक वेगाने होण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. () 'रुग्णसंख्या किती वाढते आहे हे अजून दहा दिवसांनी स्पष्ट होईल. सर्व निर्बंध खुले केल्यानंतरही रुग्णसंख्येचा फैलाव अधिक वेगाने झालेला नाही. लसीकरणामुळे करोना संसर्गाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला आहे,' असे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. मुंबईमध्ये अनेक जण कामानिमित्त येतात. उपनगरांमधून येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशा व्यक्तींचे प्रमाण आठ ते दहा टक्के असल्याची शक्यता पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केली. वाचा: शहरातून ज्याप्रमाणे ग्रामीण तसेच, आदिवासी भागांत जाऊन लसीकरण केले जात होते, त्याचप्रकारे आता लशींची उपलब्धता असलेल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन लसीकरण करून घेण्याचा कल वाढता आहे. कोविन अॅपमध्ये नोंदणी केल्यानंतर लस कोणत्याही ठिकाणी जाऊन घेण्याचे स्वातंत्र्य असले तरी त्या गावातील वा जिल्ह्यातील स्थानिकांमध्ये यावरून नाराजीचे वातावरण होते. मुंबईने मात्र या संदर्भात सहकार्याची भूमिका घेतली असून मुंबई शहरात येणाऱ्यांना ही सुविधा देण्यात आली आहे. खासगी क्षेत्रही सक्रिय मुंबईमध्ये आत्तापर्यंत १ कोटी १६ लाख ५२ हजार २३६ जणांचे लसीकरण झाले आहे. १८ ते ४४ या वयोगटातील लसधारकांची संख्या ही ५७ लाख ९२ हजार ९३९ नोंदवण्यात आली असून ७ लाख ४७ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. खासगी क्षेत्रातून एक लाखांहून अधिक मात्रा देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबईचा समावेश आहे. मुंबईमध्ये ४५,७३,८९५ मात्रा खासगी क्षेत्रातून देण्यात आल्या आहेत. वाचा: