अफगाणिस्तानमधील स्थितीवर PM मोदींची उच्चस्तरीय बैठक; ३ तास खल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 2, 2021

अफगाणिस्तानमधील स्थितीवर PM मोदींची उच्चस्तरीय बैठक; ३ तास खल

https://ift.tt/3t47sNQ
नवी दिल्लीः अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. ही बैठक जवळपास ३ तास चालली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि परराष्ट्र मंत्री एक. जयशंकर हे या बैठकीत उपस्थित होते. अफगाणिस्तानमधील सद्यस्थितीसह पुढे उचलण्यात येणाऱ्या भारताच्या पावलांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं टीव्ही रिपोर्ट्समधून सांगण्यात आलं. कतारमधील दोहा इथं भारतीय राजदुतांनी तालिबानच्या नेत्याशी मंगळवारी औपचारीक चर्चा केली. या पार्श्वभूमीवर दुसऱ्याच दिवशी ही उच्चस्तरीय बैठक झाली. कतारच्या दोहामध्ये भारतीय राजदूत दीपक मित्तल आणि तालिबानचा नेता शेर मोहम्मद स्टेनकझई यांच्यात मंगळवारी चर्चा झाली. अफगाणिस्तानमध्ये अजून मोठ्यासंख्येत भारतीय नागरिक अडकले आहेत. याशिवाय अल्पसंख्यक समाजाचे (हिंदू आणि शीख) अफगाण नागरिकही भारतात येऊ इच्छित आहेत . त्यांनाही भारतात आणण्यासाठी भारताने 'ऑपरेशन देवी शक्ती' राबवले आहे. पण अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे संपूर्ण सैन्य ३१ ऑगस्टला परतल्यानंतर हे ऑपरेशन थांबले आहे. तालिबानच्या मागणीवरून कतारमध्ये भारताचे राजदूत दीपक मित्तल आणि तालिबानच्या नेत्यामध्ये भारतीय दुतावासात ही बैठक झाली. अफगाणिस्तानच्या जमिनीवरून कुठल्याही प्रकारे भारताविरोधात दहशतवादी कारवाया केला जाऊ नयेत, असं भारताने तालिबानच्या नेत्याला स्पष्ट केलं. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांना लवकारत लवकर मायदेशात आणणं हा चर्चेचा मुद्दा होता. तसंच ज्या अफगाण नागरिकांना भारतात यायचं खासकरून अल्पसंख्याकांना त्यांना येऊ द्यावं. भारताच्या मुद्द्यांवर सकारात्मक पाऊल उचलले जाईल, असं आश्वासन तालिबानच्या नेत्याने यावेळी दिलं.