
न्यूयॉर्क: आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणताही प्रवास केलेला नसताना, अमेरिकेच्या वेगवेगळ्या राज्यांतील चार नागरिकांना उष्णकटिबंधीय प्रदेशातील आजाराची जीवघेणी बाधा कशी झाली, याचे रहस्य अमेरिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. भारतातून आयात केलेला अरोमाथेरपी स्प्रे यांच्या जिवावर बेतल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आजार नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने याबाबत शनिवारी माहिती दिली. मेलियोइडोसिस हा आजार ज्या प्रकारच्या जीवाणूंमुळे होतो, ते एका रुग्णाच्या घरात सापडलेल्या स्प्रेच्या बाटलीमध्ये आढळले. जॉर्जिया, मिनेसोटा, टेक्सास आणि कान्सास येथे राहणाऱ्या चौघांना याची बाधा झाली. यापैकी जॉर्जियात राहणाऱ्या एका लहान मुलासह दोघांचा मृत्यू झाला आहे. या चार रुग्णांमध्ये आढळलेले जीवाणूच त्या बाटलीतील स्प्रेमध्ये आढळल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चारही बाधितांच्या घराजवळील जमीन, पाणी आणि इतर वस्तूंची तपासणी केली जात आहे. या चौघांना झालेल्या बाधेचा केंद्राकडून बारकाईने अभ्यास करण्यात आला. यात जॉर्जियाच्या रुग्णाच्या घरात भारतातून मागवलेला स्प्रे सापडला. हा अरोमा स्प्रे वॉलमार्टच्या ५५ दुकाने आणि वेबसाइटवर फेब्रुवारीपासून विकला जात होता. दरम्यान, शुक्रवारी वॉलमार्ट आणि ग्राहक संरक्षण आयोगाने ३,९०० बाटल्या माघारी बोलावल्या आहेत. जीवाणू असलेला स्प्रे वॉलमार्टच्या ५५ स्टोअर आणि त्यांच्या संकेतस्थळावरून फेब्रुवारी ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान विक्रीसाठी उपलब्ध होता.