मुंबई: दिल्ली-मुंबई विमान प्रवासादरम्यान एका अभिनेत्रीचा (Actress ) झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गाझियाबादमधील एका व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. मुंबईत राहणारी ४० वर्षीय महिला अभिनेत्री १ ऑक्टोबर रोजी कामानिमित्त दिल्लीला गेली होती. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी ती मुंबईला परतण्यासाठी विमानातून प्रवास करत होती. हे विमान सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यावेळी विमानातून उतरताना एका प्रवाशाने सदर महिलेची छेड काढत तिला पाठीमागून मिठी मारली. या सर्व प्रकारानंतर महिलेनं छेड काढणाऱ्या पुरुषाला समज दिली आणि त्यानंतर पोलीस स्थानकात या घटनेबाबत तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरून छेड काढणाऱ्या पुरुषाविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी गाझियाबाद येथील एक व्यावसायिक असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी १४ ऑक्टोबर रोजी सदर आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास करण्यात येत आहे. दरम्यान, विमान प्रवासादरम्यान एका अभिनेत्रीचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चेत आला आहे.