नवी दिल्लीः काँग्रेस नेते यांना उत्तर प्रदेश सरकारने लखीमपूर खेरीला भेट देण्यास परवानगी नाकारली आहे. राहुल गांधी हे उद्या बुधवारी लखीमपूरला जाणार होते. आता उत्तर प्रदेशातील योगी सरकारने त्यांना परवानगी नाकारल्याने राहुल गांधी पुढे काय करणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. लखीमपूरमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारात ४ शेतकऱ्यांसह एकूण ८ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर विरोधी पक्षाचे नेते तिथे जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि राज्यातील योगी सरकार त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी यांची बहीण प्रियांका गांधी वाड्रा यांनीही लखीमपूरला जाण्याचा प्रयत्न केला. पण उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काँग्रेसने पत्र लिहिलं. त्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ५ सदस्यांच्या शिष्टमंडळाची लखीमपूर दौऱ्यावर जाण्याची योजना आहे. तसंच प्रियांका गांधी वाड्रा यांना कोणत्याही सबळ कारणाशिवाय किंवा औचित्याशिवाय अटक केल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. मोठ्या सभांवर बंदी घालण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत, हे कारण देत योगी सरकारने राहुल गांधींच्या भेटीला परवानगी नाकारली. दुसरीडे, प्रियांका गांधी यांनी एक व्हिडिओ जारी करत पुन्हा योगी सरकारवर निशाणा साधला आहे. ३८ तास होऊन गेले तरी आपल्यावर काय आरोप आहेत ते सांगितलं गेलेलं नाही आणि वकिलांशीही बोलू दिलं जात नाहीए, असं प्रियांका गांधींनी म्हटलंय.