
आरोग्य विभागाच्या भरतीसाठी रविवारी २४ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा होत आहे. मात्र परीक्षा सुरू होण्याआधीच नाशिक, पुण्यासह काही परीक्षा केंद्रांवर गोंधळ उडाला. नाशिकमधील गिरणारे येथील परीक्षा केंद्रावर उपस्थित उमेदवारांपेक्षा कमी प्रश्नपत्रिका आल्या. पुण्यातल्या केंद्रावरही हा प्रकार घडला. त्यामुळे ही आधीच गोंधळावरून गाजलेली भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर पेपरची वेळ झाली तरी प्रश्नपत्रिका पोहोचल्या नव्हत्या, अशा तक्रारी उमेदवारांनी केल्या आहेत. प्रश्नपत्रिका तर नाहीतच शिवाय पर्यवेक्षकही उपस्थित नव्हते, अशी माहिती आहे. त्यामुळे तेथे विद्यार्थी संतप्त झाले होते. नाशिकमध्ये गिरणारे केंद्रावर ४५० उमेदवार परीक्षा देणार असताना प्रश्नपत्रिका मात्र ३०० आल्याने एकच गोंधळ उडाला. काही विद्यार्थ्यांकडे त्यांचे ओळखपत्रही नीट नव्हते. नाशिक मंडळात साधारणत: ४३० पदांसाठी ही परीक्षा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात प्रथम सत्रात १८ हजार ८७, तर द्वितीय सत्रात १८ हजार १८३ उमेदवार परीक्षा देणार आहेत. गट क संवर्गाची परीक्षा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. विविध ५२ प्रकारच्या पदांसाठी ही परीक्षा होत असून, सकाळच्या सत्रात २५, तर दुपारच्या सत्रात २७ प्रकारच्या पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रात शस्त्रक्रियागृह सहायक, अवैद्यकीय सहायक, उच्चश्रेणी लघुलेखक, ग्रंथपाल, तंत्रज्ञ, निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक, वरिष्ठ तांत्रिक सहायक, सेवा अभियंता यासह एकूण २५ पदांसाठी परीक्षा होणार आहे. दुपारच्या सत्रात अधिपरिचारिका, अभिलेखापाल, आहारतज्ज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, कनिष्ठ लिपिक, क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी यांसारख्या २७ पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा १०० गुणांची असणार आहे. त्यामध्ये उमेदवारांना मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्यज्ञान आणि तांत्रिक प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित आहे. राज्यात गट क संवर्गाची दोन हजार ७३९ पदे रिक्त आहेत.