लग्नासाठी ज्योतिषाची मदत घेणे महिलेला पडले महागात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 22, 2021

लग्नासाठी ज्योतिषाची मदत घेणे महिलेला पडले महागात

https://ift.tt/3ChaWjy
म. टा. खास प्रतिनिधी चाळीशी जवळ आली, तरी विवाह जमत नसल्याने व्यथित झालेल्या तरुणीला लग्नासाठी ज्योतिषाची मदत घेणे महागात पडले. लग्न जुळण्यासाठी होमहवनाचे कारण पुढे करीत या ज्योतिषाने तरुणीकडून १ लाख ६० हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणीने कांदिवली पोलिस ठाण्यात तक्रार केली. कांदिवली पश्चिमेला राहणारी रुपाली (बदललेले नाव) एका बँकेत नोकरी करते. रुपालीचे कुटुंबीय अनेक दिवसांपासून तिच्यासाठी मुलगा पाहत होते. परंतु तिचा विवाह जमत नव्हता. 'तुझ्या जन्मपत्रिकेमध्ये काहीतरी अडचण असणार त्यामुळे लग्न जमत नाही' असे कुणीतरी रुपालीला सांगितले. रुपालीने यासाठी एखाद्या ज्योतिषाची मदत घेण्याचे ठरविले. तिने इंटरनेटच्या माध्यमातून ज्योतिषाचा शोध सुरू केला. पंडितजी विक्रम शर्मा नावाच्या ज्योतिषाची जाहिरात पाहिल्यावर रुपालीने जाहिरातीमधील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. विक्रम शर्मा याने रुपालीला जन्मपत्रिका पाठविण्यास सांगितले. जन्मपत्रिकेमध्ये दोष असल्याचे सांगून लग्न जुळविण्यासाठी होमहवन करावे लागेल, असे शर्मा म्हणाला. ती होम हवन करण्यास तयार झाली. शर्माने होम हवन आणि पूजा करण्यासाठी ३० हजार रुपये खर्च येईल आणि हे पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास सांगितले. रुपालीने ही रक्कम पाठवली. पूजेमध्ये विघ्न येत असल्याचे सांगून शर्माने आणखी पैशांची मागणी केली. दोन ते तीन वेळा रुपालीने त्याला ऑनलाइन जवळपास १ लाख ६० हजार पाठविले. इतके पैसे पाठवूनही लग्न जमत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचा संशय तिला आला. तिने शर्माला याबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तिच्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.