
जालना : राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अनेक तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला आहे. अशातच करोनाच्या नव्या AY.४ या व्हेरिएंटचे ( AY.4 Variant) रुग्ण महाराष्ट्रात आढळल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र आरोग्यमंत्री यांनी हे वृत्त फेटाळून लावलं असून महाराष्ट्रात अद्याप करोनाच्या या व्हेरिएंटने शिरकाव केला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 'महाराष्ट्रात करोनाच्या AY.४ व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. हा शिरकाव महाराष्ट्रात होऊ नये म्हणून आरोग्य विभागाला योग्य सूचना केल्या जातील,' अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालन्यात बोलत होते. केंद्राच्या टास्क फोर्सने जलदगतीने लसीकरण करण्याच्या सूचना राज्यांना केल्याची माहिती समोर आली असून मिशन कवचकुंडल अंतर्गत महाराष्ट्रात दिवाळीपर्यंत वेगाने लसीकरण केलं जाणार असल्याचंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. लसीकरण वेगाने होण्यासाठी आणखी काही विभागांची मदत घेतली जात असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली. दरम्यान, 'सध्या कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवस इतकं आहे. या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा केंद्र सरकारचा मानस नाही, त्यामुळे हे अंतर आहे तसंच कायम राहील,' असंही राजेश टोपे म्हणाले.