
दुबई : चेन्नईच्या संघाने जेव्हा २०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर २७ धावांनी विजय साकारला तेव्हा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या संघातील खेळाडूंना एक खुण केल्याचे पाहायला मिळाले. धोनीचा हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. चेन्नईच्या संघाने जेव्हा सामना जिंकला तेव्हा सर्वांच्या नजरा या धोनीकडे वळलेल्या होत्या. कारण धोनी आता या विजयाचे सेलिब्रेशन कसे करणार, याची उत्सुकता सर्वांना होती. त्यामुळे धोनीकडे सर्वांच्या नजरा खिळलेल्या होत्या. जेव्हा चेन्नईच्या संघाने विजय साकारला तेव्हा धोनीकडे कॅमेरा मारण्यात आला होता. त्यावेळी धोनीने संघातील खेळाडूंना हाताने एक खुण केल्याचे पाहायला मिळाले. धोनी आपल्या दोन्ही हातांनी ही खुण करत होता. त्यावेळी धोनीला विजयानंतर हेच सांगायचे होते की, जिंकल्यावर आता स्टम्प काढायला घ्या... कारण क्रिकेटमध्ये विजय मिळवल्यावर स्टम्प काढण्याची एक प्रथा आहे आणि धोनीला ही गोष्ट भारी आवडत असल्याचे आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. कारण जेव्हा जेव्हा धोनीने मैदानात असताना विजय मिळवला आहे तेव्हा तेव्हा धोनीने स्टम्प काढत आनंद साजरा केला आहे. पण यावेळी ही संधी त्याने आपल्या संघातील खेळाडूंना दिल्याचे पाहायला मिळाले. कदाचित धोनीचा हा अखेरचा सामना असेल आणि यापुढे मी मैदानात जिंकल्यावर स्टम्प काढायला येणार नाही, असे संकेत धोनीला द्यायचे असतील. त्यामुळे धोनीने ही गोष्ट केल्याचे आता म्हटले जात आहे. महेंद्रसिंग धोनी हा चेन्नई सुपर किंग्स संघाच्या विजयाचा मास्टरमाइंड होता. कारण कोणत्या खेळाडूचा कसा वापर करायचा, हे धोनीला सर्वात चांगले जमते. चेन्नईच्या संघाने १९२ धावा जरी केल्या असल्या तरी केकेआरच्या सलामीवीरांनी धडाकेबाज सुरुवात करत पहिल्या पॉवर प्लेमध्ये अर्धशतक पूर्ण केले होते. त्यावेळी धोनीने आपले डोकं शांत ठेवत गोलंदाजीमध्ये बदल केले आणि त्यामुळेच चेन्नईला विजय मिळवता आला. कारण धोनीसारखा शांत कर्णधार नसला असता तर कदाचित आजच्या सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता.