जम्मूः कॅप्टन जयंत जोशी यांचा मृतदेह शोधण्यासाठी लष्कर आणि नौदलाचे अथक प्रयत्न सुरू होते. अखेर ७५ दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला. ३ ऑगस्ट २०२१ ला रणजीत सागर धरणात हेलिकॉप्टर कोसळले होते. या घटनेत एका पायलटचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते. पण कॅप्टन जयंत जोशी हे बेपत्ता होते. अखेर अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांचा मृतदेह सापडला आणि तो बाहेर काढण्यात आला. कॅप्टन जयंत जोशी हे फक्त २७ वर्षांचे होते. रणजीत सागर धरण अतिशय खोल आहे. यामुळे बेपत्ता कॅप्टन जयंत जोशी यांना शोधण्यात अनेक अडचणी येत होत्या. शोध आणि बचाव पथकाने धरणाच्या तळापर्यंत शोध घेतला. यासाठी मल्टी बीम सोनार या अद्ययावत तंत्रज्ञाचा उपयोग केला. या तंत्रज्ञानाद्वारे आज पुन्हा धरणाच्या तळाशी शोध घेतला गेला. तेव्हा ६५ ते ७० मीटर खोलीवर कॅप्टन जयंत जोशी यांचा मृतदेह आढळला. यानंतर rov रोबोटद्वारे धरणाच्या तळाशी जाऊन त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर स्थानिक वैद्यकीय पथकाकडून मृतदेहाची तपासणी केली गेली. यानंतर पठाणकोटमधील लष्कराच्या हॉस्पिटलकडे पुढील तपासणीसाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. संरक्षण विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. कॅप्टन जयंत जोशी हे लष्कराच्या हेलिकॉप्टरचे पायलट होते. रणजीत सागर धरणात त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले. ऑगस्टमध्ये ३ तारखेला ही दुर्घटना घडली होती. पठाणकोटमधील लष्कराच्या कॅन्टोन्मेंटमधून रुद्रा हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. उड्डाण घेतल्याच्या काही मिनिटांतच ते रणजीत सागर धरणात कोसळले होते. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते. धरणात हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर लेफ्टनंट कर्नल ए. एस बाथ यांचा मृतदेह ७५.९ मीटर इतक्या खोल पाण्यातून बाहेर काढला काढण्यात आला होता. घटनेच्या १२ दिवसांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. म्हणजे १२ ऑगस्टला त्यांचा मृतदेह बाहेर काढला होता. तेव्हापासून दुसरे बेपत्ता पायलट कॅप्टन जयंत जोशी यांचा शोध सुरू होता.