
नवी दिल्ली : देशाला संबोधित करत आहेत. आपल्या भाषणाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेदवाक्यानं केली. सोबतच, गुरुवारी भारतानं कायम केलेल्या लसीकरणाच्या १०० कोटी मात्रांच्या रेकॉर्डचा उल्लेख आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या संबोधनात पुन्हा एकदा देशाचं १०० कोटी लसीचे डोस पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन केलं. हे आपल्या संकल्पसिद्धीसाठी परिश्रमांची परिकाष्ठा करणाऱ्या नव्या भारताचं चित्र असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी म्हटलंय. आज अनेक लोक भारताच्या लसीकरण कार्यक्रमाची तुलना इतर देशांशी करत आहेत. भारताचं आज जगात कौतुक होत आहे, असंही पंतप्रधानांनी म्हटलंय. जगातील मोठ्या देशांनी लसींवर रिसर्च करणं, लसी शोधून काढणं यावर वर्चस्व मिळवलं होतं. भारत अनेकदा त्यांच्या शोधांवर अवलंबून राहत होता. भारत या महामारीला कसा तोंड देणार? लस कधी उपलब्ध होणार? एवढ्या मोठ्या प्रमाणात भारत लस कसा खरेदी करणार? अशा पद्धतीचे अनेक प्रश्न समोर येत होते. परंतु, १०० कोटी लसीचे डोस हे आज यांसारख्या अनेक प्रश्नांचं उत्तर ठरलंय, असंही पंतप्रधानांनी नमूद केलंय.