मुंबईला मोठा दिलासा; २४ तासांत एकही करोनाबळी नाही - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 18, 2021

मुंबईला मोठा दिलासा; २४ तासांत एकही करोनाबळी नाही

https://ift.tt/3FSbgb3
म. टा. प्रतिनिधी, करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करत पूर्वपदावर येत असलेल्या मुंबईला रविवारी मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या १८ महिन्यानंतर म्हणजे मार्च २०२० नंतर प्रथमच मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांमध्ये शून्य करोना मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबई महापालिका, तसेच राज्याच्या आरोग्य यंत्रणेने करोनाविरोधात दिलेल्या लढ्याला यामुळे बळ मिळाले आहे. मुंबईत करोनाचा संसर्ग झपाट्याने फैलावू लागल्यानंतर वाढते रुग्ण आणि मृत्यू यामुळे चिंता निर्माण झाली होती. विशेषत: दुसऱ्या लाटेत स्थिती खूपच भयावह झाली होती. त्यामुळे संसर्ग नियंत्रणात आणणे अत्यावश्यक बाब बनली होती. यासाठी पालिका प्रशासनाने कसोशीने प्रयत्न करत उपाययोजनांची पराकाष्ठा केली. चाचण्या, जनजागृती, तपासणी, उपचार आणि लसीकरण अशा विविध मार्गाने संसर्ग आटोक्यात आणला आहे. दरम्यान, मुंबईत गेल्या २४ तासांत ३६६ करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून ५१८ रुग्ण बरे होऊ घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांच्या कालावधीत एकही मृत्यू झाला नाही, अशी माहिती पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली आहे. गेल्या १८ महिन्यात मुंबईत करोनामुळे १६ हजार १८० जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी मुंबईत २८,६९७ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एक कोटी नऊ लाख ५७ हजार ३९२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईचा रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के इतका असून उपचाराधीन रुग्णांची संख्या पाच हजार ३० इतकी आहे तर रुग्ण दुपटीचा कालावधी १२१३ दिवस इतका असून, करोना संसर्ग दर ०.०६ टक्के इतका आहे. मुंबईत ९७ टक्के नागरिकांनी करोना प्रतिबंधक पहिली लस घेतली असून ५५ टक्के नागरिकांनी दोन्ही लशी घेतल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.