
मुंबई: '१०० कोटी लसींचं उद्दिष्ट पूर्ण झालं म्हणून पंतप्रधान मोदी यांनी देशातला सगळ्यात मोठा तिरंगा लालकिल्ल्यावर फडकविला हे योग्यच झालं; पण चिनी, पाकडे, बांगलादेशी ज्या बेदरकारपणे सीमेवर धडका मारीत आहेत ते पाहता तो भव्य, तेजस्वी तिरंगा सुरक्षित आहे काय? याचा विचार करावा लागेल. आज फक्त हिंदू नव्हे संपूर्ण हिंदुस्थानच संकटात आहे,' अशा शब्दांत शिवसेनेनं केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. () काँग्रेस व राष्ट्रवादीशी आघाडी करून सरकार स्थापन केल्यापासून भाजपनं हिंदुत्वाच्या मुद्दयावरून शिवसेनेला घेरलं आहे. या मुद्द्यावरून शिवसेनेवर सातत्यानं टीका केली जात आहे. ही टीका सुरू असताना जम्मू-काश्मीरमधील अल्पसंख्याक नागरिकांवर दहशतवादी हल्ले वाढले आहेत. बांगलादेशात हिंदू जनतेवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या येत आहेत. तसंच, चीननं भारतीय हद्दीत पुढं सरकत असल्याचीही चर्चा आहे. हाच धागा पकडून शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून () भाजपवर कडाडून हल्ला चढवला आहे. काश्मीर व बांगलादेशातील परिस्थितीचे दाखले देत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. वाचा: 'शिवसेनेनं सत्तेसाठी सोडलं, असं म्हणणाऱ्यांनी जम्मू-कश्मीरात मेहबुबा मुफ्तीच्या पक्षाशी सत्तेसाठी लावलेला निकाह विसरता येईल काय? तिथं सरळ सरळ फुटीरतावादी, अतिरेक्यांशी हातमिळवणी करूनच सत्तेचा शिरकुर्मा चापला होता. त्या शिरकुर्म्याची दातांत अडकलेली शितं तशीच ठेवून शिवसेनेला हिंदुत्वावर प्रवचनं देणं म्हणजे डोकं ठिकाणावर नसल्याचं लक्षण आहे. महाराष्ट्रात शिवसेनेनं काय केलं व करायला हवं त्यावर सल्ले देण्यापेक्षा देशाच्या सीमेवरील हिंदूंचा आक्रोश समजून घ्या. हिंदुत्व हे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी चावून फेकण्याचा चोथा नाही. एका राज्यात गोमांसावरून लोकांना ठार करायचे व दुसऱ्या राज्यात गोमांस विकायला परवानगी द्यायची हे तुमचं बेगडी हिंदुत्व. हे तुमचं नव हिंदुत्व म्हणजे षंढपणाचा कळसच झाला. हिंदुत्वावरील ही फुकाची प्रवचनं आता बंद करा! काश्मिरातील हिंदूंच्या किंकाळ्यांनी ज्यांचं मन द्रवत नाही त्यांनी महाराष्ट्रावर प्रवचनं झोडू नयेत,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. वाचा: 'मतांसाठी हिंदुत्वाचा धुरळा उडवायचा, हिंदू-मुसलमानांचा खेळ मांडायचा. यातून तणावाचं वातावरण निर्माण करून मतं मिळवायची. या खेळास आता हिंदूही विटला आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतही ‘हिंदू खतरे में’ अशी आरोळी भाजपनं प्रचार सभांतून मारली होती, पण तिथल्या हिंदू मतदारांनी शेवटी ममता बॅनर्जींनाच विजयी केले. हे असे आपण का आपटलो? हे नव हिंदुत्ववाद्यांनी स्वतःलाच विचारायला हवे,' असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे.